संघर्षाच्या मुशीत घडलेले बहुपेडी व्यक्तिमत्त्व ः ह. मो.

0
146
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

संघर्षाच्या मुशीतून घडलेले बहुपेडी व्यक्तिमत्त्व’ ही ह. मो. मराठेंची खरी ओळख आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वातील पत्रकार मोठा की साहित्यिक मोठा असा संभ्रम कोणाच्याही मनात निर्माण होईल…

सिद्धहस्त पत्रकार, प्रख्यात कथाकार आणि कादंबरीकार ह. मो. मराठे यांचे काल दि. २ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे चार वाजता निधन झाले. हे ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या वतीने फोंडा येथे कथा – कविता – साहित्य मेळावा आयोजित केला गेला होता. त्या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ह. मो. मराठे आले होते. त्यावेळी ‘गोमन्तक’चे संपादक श्री. नारायणराव आठवले हेही उपस्थित होते. जवळजवळ चाळीस वर्षे झाली त्या घटनेला. मूळच्या गोमंतकाच्या या सुपुत्राचा गोव्यात वाङ्‌मयीन उपक्रमाच्या निमित्ताने असा प्रवेश झाला होता. ‘‘साहित्याची जोपासना करताना स्वतःच्या अनुभूतीचा लेखकांनी वापर करावा. लेखनात स्वानुभवाला अतिशय महत्त्व आहे. लेखकांनी साहित्याची सेवा प्रामाणिकपणे करावी.’’ असे आवाहन त्यांनी त्या मेळाव्यात केले होते. ह. मो. मराठे त्यावेळी ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाचे संपादक होते. हे नियतकालिक त्यांनी वाचकप्रिय केले होते. तेव्हा त्यांच्याशी जो परिचय झाला आणि जे सौहार्दाचे नाते निर्माण झाले, ते शेवटपर्यंत विसरले नाहीत.

१९८५ साली पुण्यात राम गणेश गडकरी यांच्या जन्मशताब्दी प्रसंगी ते उपस्थित होते. अन्य मान्यवरांबरोबर संपूर्ण दिवस त्यांचा सहवास मला लाभला. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या ह्रदयसंवादातून त्यांच्या सुजनत्वाचे दर्शन मला घडले. साहित्यावरील निस्सीम प्रेमही दिसून आले.
कोकण मराठी परिषद, गोवातर्फे त्यांच्या गावी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या ‘बालकांड’ ह्या गाजलेल्या कादंबरीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. लगोलग दूरदर्शनवर त्यांची मुलाखत घेण्याचा योग मला आला होता. सागर जावडेकर यांचे प्रयत्न त्याला कारणीभूत ठरले होते.
ह. मो. मराठे यांच्या साहित्याचा मी चाहता होतो. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही त्यांची लघुकादंबरी मी वाचली होती. तरुण मनाची स्पंदने तिच्यात उत्कटपणे व्यक्त झाली होती. ‘काळेशार पाणी’ ही देखील त्यांची महत्त्वपूर्ण कादंबरी. इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया ह्या प्रसिद्ध इंग्रजी साप्ताहिकाने तिचा अनुवादही प्रसिद्ध केला होता. त्यांच्या ‘पक्षिणी’ या कथेतील अनुभवविश्व देखील प्रखर वास्तवावर आधारित होते. हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह. त्यांच्या ‘माधुकरी’ या कथेतील अनुभव मनाला व्यथित करणारा. ‘विरूप’ ही त्यांची कथा लक्षणीय स्वरूपाची. अनेकार्थाने ती बोलकी कथा. भाजीवाल्याचा सुशिक्षित बेकार मुलगा. वशिल्याशिवाय नोकरी मिळत नाही म्हणून त्याने रिक्षावाल्याचा धंदा स्वीकारला. त्याची उमलू पाहणारी स्वप्ने, आशा आकांक्षा उद्ध्वस्त होतात. ‘पोटासाठी कुणी रिक्षा चालवतो, कुणी कारखाना चालवतो, मी शरीर चालवते’ असे बिनदिक्कत सांगणार्‍या तरुणीकडून त्याची लुबाडणूक होते. नियतीकडून, परिस्थितीकडून, समाजाकडून, लब्धप्रतिष्ठितांकडून वंचित झालेल्या, फसवल्या गेलेल्या तरुणाची ही कथा आहे. समकालीन समाजातील तरुणाचे प्रातिनिधिक दर्शन घडवणारी ती कथा वाटते. सावित्री १, सावित्री २ ही कथा संस्मरणीय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील स्पर्धा व त्या स्पर्धेत स्त्रीला प्राप्त झालेले स्वरूप लेखकाने समर्थपणे सूचित केले आहे. विद्यमान काळात जीवनमूल्यांची जी होरपळ झालेली आहे, तिचा तितक्याच ज्वलंत शैलीत आविष्कार करण्याचे सामर्थ्य ह. मो. मराठे यांच्या लेखणीत होते.

कथालेखनाकडून ह. मो. मराठे कादंबरीलेखनाकडे वळले. त्यांनी आयुष्याशी जो संघर्ष केला, त्यातून त्यांची सृजनात्मकता फुलत गेलेली आहे. त्यांच्या ठिकाणी अन्य कोणी असता, तर मोडून पडला असता. पण त्यांनी आपली अभंग जिद्द सोडली नाही. त्यांची ‘बालकांड’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणजे त्यांच्या होरपळलेल्या बालजीवनाची करूण कहाणी आहे. त्याच विक्षिप्त, दुराग्रही आणि क्रूरतेने दुष्ट नियतीच्या रूपात आजूबाजूला वावरणारी माणसे, सगेसोयरे यांनी त्यांचा उपहासच केला. त्यांच्या आत्याच्या घरी त्यांना आलेल्या कटू अनुभवाविषयी वाचताना अंगावर काटा उभा राहतो. मात्र, मालवणला राहून शिंप्याचे काम करणार्‍या वडील बंधूने त्याला तारले. त्याचे ऋण ह. मो. मराठे कधी विसरले नाहीत. ‘कासरा’ ही त्यांची कादंबरी असाच चटका लावते. मराठीतील अनेक समीक्षकांनी या प्रांजळ, प्रवाही आणि पारदर्शी कादंबरीचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यांचे चुरचुरीत, खमंग सदरलेखनही वाचनीय असायचे. राजकारणात त्यांना रस नव्हता, पण राजकारणी लोकांचे डावपेच त्यांना ज्ञात होते. बदलत्या काळातील उद्योजकतेचे जग त्यांनी जवळून पाहिले होते. या व्यामिश्रतेने भरलेल्या जीवनव्यवहाराचे दर्शन घडवणार्‍या कादंबर्‍याही ह. मो. मराठे यांनी तितक्याच कुशलतेने लिहिल्या. ‘देवाची घंटा’ (१९७७), ‘इतिवृत्त’ (१९९१), ‘प्रास्ताविक’ (१९८६), ‘सॉफ्टवेअर’ (१९८६), ‘मार्केट’ (१९८८) आणि ‘कलियुग’ (१९९१) या कादंबर्‍यांचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. संघर्षाच्या मुशीतून घडलेले बहुपेडी व्यक्तिमत्त्व’ ही ह. मो. मराठेंची खरी ओळख आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वातील पत्रकार मोठा की साहित्यिक मोठा असा संभ्रम कोणाच्याही मनात निर्माण होईल, पण एक मात्र निश्‍चित. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यांनी निर्भीड पत्रकारितेचा वारसा आणि सृजनात्मक लिखाण करताना आपली कोमल संवेदनशीलता जपली. दोन्ही क्षेत्रे समतोल वृत्तीने सांभाळणारे एकसंध व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल.