संकटात सापडलेल्या कार्यकर्त्याची अरविंद केजरीवालांकडून विचारपूस

0
100

>> डिचोली मार्केटला दिली खास भेट

 

येथील आपच्या कार्यकर्त्या जुलेमा बी. शेख यांच्या डिचोली मार्केटातील फळांच्या दुकानाला अज्ञातांनी आग लावल्याने गोवा दौर्‍यावर असलेले आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काल डिचोलीत खास भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, शांतताप्रिय गोव्यात हिंसेला थारा नाही. अशा परिस्थितीत डिचोलीत आम आदमी कार्यकर्त्यांचे दुकान जाळून हिंसा करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. २०१२ साली कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून भाजपला साथ दिली होती. मात्र, भाजपही भ्रष्टाचाराने बरबटलेला असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्रीकरांनी जनतेची फसवणूक केली असल्याने जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्‍वासाला तडा गेला आहे. गोव्यात आपने नव्या दमाने काम सुरू केले असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे आपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे आरोप केजरीवाल यांनी केला.
भाजप व कॉंग्रेसला कंटाळलेल्या गोमंतकीय जनतेला आपच्या रूपाने उत्तम पर्याय असून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस राजकारणात साफ होणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. गोव्यात आम आदमी पक्ष मुसंडी मारून सत्तेपर्यंत वाटचाल करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, जुलेमा शेख यांनी आपण आपची कार्यकर्ता असल्याचे सांगून अज्ञातांनी रात्रीच्या वेळी दुकानाला लावलेल्या आगीत ५० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवल्याचे त्या म्हणाल्या.