गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर मिळालेल्या संधीचा लाभ उठवित नूतन कर्णधार श्रेयस अय्यरने केलेली तुफानी खेळी आणि पृथ्वी रॉयच्या तडफदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने कोलकाता नाइट रायडर्सला धावांनी ५५ नमवून पराभवाची मालिका संपवली आहे. सलग पाच सामन्यांतील पराभवानंतर दिल्लीचा हा पहिला व स्पर्धेतील दुसरा विजय ठरला.
दिल्ली डेअरडेविल्सकडून मिळालेल्या २२० धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायर्डसला ९ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावांपर्यंत मजल मारता आली. आंद्रे रसेलने सर्वाधिक ३० चेंडूत ४४ धावा केल्या, त्याला शुभमन गिल २९ चेंडूत ३७ धावा काढून चांगली साथ दिली पण शुभमन गिल धावबाद झाला. सुनील नारायणने २६ तर कर्णधार दिनेश कार्तिकने १८ धावा जोडल्या. इतर सर्व फलंदाज दिल्लीच्या सूत्रबद्ध गोलंदाजीपुढे अपयशी ठरले. दिल्लीतर्फे ट्रेंट बौल्ट, ग्लेन मॅक्सवेल, आवेश खान आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी २ बळी मिळवित विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी नूतन कर्णधार श्रेयस अय्यरच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्स संघानेकोलकाता नाइटरायडर्सकडून मिळालेल्या प्रथम फलंदाजीसाठीच्या निमंत्रणाचा भरपूर लाभ उठवित ४ गडी गमावत २१९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. नवीन नेतृत्वाखाली खेळताना अंडर-१९ विश्वचषकाचा कर्णधार पृथ्वी शॉने कॉलिन मुन्रोच्या साथीत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. कॉलिन मुन्रो ३३ धावा करून शिवम मावीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर पृथ्वीने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीत दुसर्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ६८ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. ७ चौकार व २ षट्कारांसह ४४ चेंडूत ६२ धावांची खेळी केलेला पृथ्वी पियुष चावलाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होऊन परतला. लगेच गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर ऋषभ पंत आपले खातेही न खोलता आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर यष्ट्यांमागे दिनेश कार्तिककडे झेल देऊन बाद झाला. त्यावेळे १४.२ षट्कांत दिल्लीची स्थिती ३ बाद १२९ अशी झाली होती. परंतु त्यानंतर श्रेयसने कर्णधारी तडाखा दाखविताना ३ चौकार व १० षट्कारांची आतषबाजी करताना ४० चेंडूत ९३ झंजावती नाबाद खेळी करीत दिल्लीला २१९ अशी आव्हनात्मक धावसंख्या उभारून दिली. ग्लेन मॅक्सवेलने २७ धावांचे योगदान दिले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३१ चेंडूत ७३ धावा जोडल्या.
धावफलक,
दिल्ली डेअरडेविल्स ः पृथ्वी शॉ त्रिफळाचित गो. पियुष चावला ६२, कॉलिन मुन्रो त्रिफळाचित शिवम मावी ३३, श्रेयस अय्यर नाबाद ९३, ऋषभ पंत झे. दिनेश कार्तिक गो. आंद्रे रसेल ०, ग्लेन मॅक्सवेल धावचित (शिवम मावी) २७, विजय शंकर नाबाद ०.
अवांतर ः ४. एकूण २० षट्कांत ४ बाद २१९ धावा.
गोलंदाजी ः पीयुष चावला ४/०/३३/१, कुलदीप यादव २/०/२२/०, शिवम मावी ४/०/५८/१, सुनील नारायण ३/०/३५/०, मिशेल जॉन्सन ४/०/४२/०, आंद्रे रसेल ३/०/२८/१.
कोलताना नाईटरायडर्स ः ख्रिस लीन त्रिफळाचित गो. ग्लेन मॅक्सवेल ५,
सुनील नारायण झे. श्रेयस अय्यर गो. ट्रेंट बौल्ट २६, रॉबिन उथप्पा झे. पृथ्वी शॉ गो. ट्रेंट बौल्ट १, नितीश राणा झे. व गो. आवेश खान ८, दिनेश कार्तिक झे. ट्रेंट बौल्ट गो. अमित मिश्रा १८, शुभमन गिल धावचित (श्रेयस अय्यर) ३७, आंद्रे रसेल त्रिफळाचित गो. आंद्रे रसेल ४४, शिवम मावी त्रिफळाचित गो. अमित मिश्रा ०, पियुष चावला झे. कोलिन मुन्रो गो. ग्लेन मॅक्सवेल २, मिशेल जॉन्सन नाबाद १२, कुलदीप यादव नाबाद ७.
अवांतर ः ४. एकूण २० षट्कांत ९ बाद १६४.
गोलंदाजी ः ट्रेंट बौल्ट ४/०/४४/२, ग्लेन मॅक्सवेल २/०/२२/२, आवेश खान ४/०/२९/२, लियाम प्लंकेट ४/०/२४/०, अमित मिश्रा ४/१/२३/२, विजय शंकर १/०/१०/०, राहुल तेवातिया १/०/११/०.