श्रीलंकेची सावध सुरुवात

0
111

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेने २ बाद ८५ धावा केल्या आहेत. पावसामुळे शुभारंभी दिनी केवळ ३६.३ षटकांचा खेळ होऊ शकला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने ४९ धावा करून आपल्या २३व्या कसोटी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असून माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने अजून खाते उघडलेले नाही.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर थिरिमाने याने करुणारत्नेसह डावाची सुरुवात केली. खेळपट्टीचा अंदाज बांधण्यासाठी भरपूर वेळ घेतल्यानंतर थिरिमाने याने बेजबाबदार फटका खेळून आपली विकेट फेकली. दोन धावांसाठी त्याने ३५ चेंडूंचा सामना केला.

तिसर्‍या स्थानावर आलेला कुशल मेंडीस याने मैदानावर उतरताच धाडसी फटके खेळले. पुढे सरसावत गोलंदाजांची लय बिघडवण्याचा प्रयत्नदेखील त्याने केला. हे सर्व करत असतानाच ग्रँडहोमच्या एका किंचित बाहेर जाणार्‍या चेंडूला दूर राहत छेडण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग याच्याकडे सोपा झेल देऊन त्याने तंबूची वाट धरली.
श्रीलंकेने आपल्या संघात एक बदल करताना प्रमुख फिरकीपटू अकिला धनंजया याला बाहेर बसवताना अष्टपैलू दिलरुवान परेराला संघात घेतले. श्रीलंका क्रिकेट मंडळ अकिला याला गोलंदाजीची शैली तपासण्यासाठी लवकरात लवकर बायोमॅकेनिकल चाचणीला पाठवण्याची शक्यता आहे. याच कारणास्तव त्याला बाहेर बसविण्यात आले आहे.

दुसरीकडे न्यूझीलंडने मिचेल सेंटनरला विश्रांती देताना कॉलिन डी ग्रँडहोम या मध्यमगती गोलंदाजी करणार्‍या अष्टपैलूचा संघात समावेश केला.

धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः दिमुथ करुणारत्ने नाबाद ४९, लाहिरु थिरिमाने झे. विल्यमसन गो. सॉमरविल २, कुशल मेंडीस झे. वॉटलिंग गो. ग्रँडहोम ३२, अँजेलो मॅथ्यूज नाबाद ०, अवांतर २, एकूण ३६.३ षटकांत २ बाद ८५
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ७-२-२०-०, टिम साऊथी १२-४-२२-०, कॉलिन डी ग्रँडहोम ८.३-२-१४-१, विल्यम सॉमरविल ६-३-२०-१, ऐजाझ पटेल ३-१-७-०