>> मॅथ्यूज-चंदीमलच्या शतकांनी टाळला फॉलोऑन
अँजेलो मॅथ्यूज (१११) व दिनेश चंदीमल (नाबाद १४७) या माजी-आजी कर्णधारांनी ठोकलेल्या शतकांच्या बळावर श्रीलंकेने भारताविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी फॉलोऑन टाळण्यात यश मिळविले आहे. भारताच्या ५३६ धावांना उत्तर देताना लंकेने तिसर्या दिवसअखेर ९ बाद ३५६ धावांपर्यंत मजल मारली असून त्यांचा संघ अजूनही १८० धावांनी पिछाडीवर आहे. सामन्याचे आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने कसोटी रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.
भारताने आपला पहिला डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केल्यानंतर दुसर्या दिवशी लंकेने दिवसअखेर ३ बाद १३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज सकाळच्या सत्रात माजी कर्णधार मॅथ्यूज आणि चंदीमलने भारतीय गोलंदाजांना यशापासून दूर ठेवले. या द्वयीने तब्बल १८१ धावांची भागीदारी केली. यादरम्यान मॅथ्यूजने आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर १११ धावांची खेळी करून तो बाद झाला. मात्र तोपर्यंत लंकेचा डाव २५० पार पोहोचला होता.
मॅथ्यूजनंतर चंदीमलेने सदीरा समरविक्रमाला सोबत घेत लंकेचा डाव ३००च्या पार नेला. अर्धशतकाकडे वाटचाल करणार्या समरविक्रमाला ईशांत शर्माने ३३ धावांवर सहाकरवी झेलबाद केले. यादरम्यान चंदीमले आपले दहावे कसोटी शतक पूर्ण केले. समरविक्रमा बाद झाल्यानंतर लंकेचा डाव कोलमडला आणि २६ धावांच्या आत त्यांचे ४ गडी बाद झाले. त्यामुळे तिसर्याच दिवशी लंकेचा डाव संपवण्याची संधी भारताकडे होती. मात्र चंदीमलने संदाकनसह शेवटची तीन षटके चिवट खेळ करत लंकेचा डाव लांबविला. भारताकडून अश्विनने ३ तर जडेजा, शामी आणि ईशांत शर्माने प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत.
धावफलक
भारत पहिला डाव ७ बाद ५३६ घोषित
श्रीलंका पहिला डाव ः (३ बाद १३१ वरून) ः अँजेलो मॅथ्यूज झे. साहा गो. अश्विन १११, दिनेश चंदीमल नाबाद १४७, सदीरा समरविक्रमा झे. साहा गो. ईशांत ३३, रोशन सिल्वा झे. धवन गो. अश्विन ०, निरोशन डिकवेला त्रि. गो. अश्विन ०, सुरंगा लकमल झे. साहा गो. शामी ५, लाहिरु गमागे पायचीत गो. जडेजा १, लक्षन संदाकन नाबाद ०, अवांतर १६, एकूण १३० षटकांत ९ बाद ३५६
गोलंदाजी ः मोहम्मद शामी २४-६-७४-२, ईशांत शर्मा २७-६-९३-२, रवींद्र जडेजा ४४-१३-८५-२, रविचंद्रन अश्विन ३५-८-९०-३
मॅथ्यूजच्या शतकाला रोहितचा हातभार
ईशांत शर्माने टाकलेल्या डावातील ८२व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा याने स्लिपमध्ये अँजेलो मॅथ्यूज याचा सोपा झेल सोडला. यावेळी मॅथ्यूज ९८ धावांवर खेळत होता. याच षटकातील तिसर्या चेंडूवर चौकार ठोकून मॅथ्यूजने भारताविरुद्धचे आपले तिसरे कसोटी शतक पूर्ण केले. यानंतर बदली खेळाडू विजय शंकरने ‘मिड ऑफ’वर वैयक्तिक १०४ धावांवर मॅथ्यूजला जीवदान दिले. रोहितच्या तुलनेत हा झेल खूप कठीण होता.