कॉंग्रेसाध्यक्षपदाच्या उंबरठ्यावर राहुल

0
80

गेल्या पाच वर्षांपासून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या राहुल गांधी यांनी काल अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून आपला अर्ज काल सादर केला. काल उमेदवारी अर्ज सादरीकरणासाठी शेवटचा दिवस होता. अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने राहुल यांची देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरील वर्णी ही आता औपचारिकता ठरली आहे.

गेल्या १९ वर्षांपासून कॉंग्रेसाध्यक्षपदाचा धुरा सांभाळण्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडून कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास त्यांचे ४७ वर्षीय सुपुत्र राहुल आता सज्ज झाले आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी काल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर आपला अर्ज सादर केला. सोनिया गांधी यांनी राहुल यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविलेले असले तरी त्या यावेळी उपस्थित नव्हत्या. राहुल यांनी व्यक्तिश: सादर केलेल्या अर्जावर सूचक म्हणून सोनिया गांधीसह, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, मोहसिना किडवाई, कमलनाथ, शीला दीक्षित, अशोक गेहलोट, मुकुल वासनिक, तरूण गोगोई, व्ही. नारायणस्वामी यांच्या सह्या आहेत.