श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा

0
232

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली माहिती

>> एम्सच्या डॉक्टरांची मदत घेणार

सोमवारी रात्री कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात अंकोल्याजवळ रस्ता अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता सुधारत आहे. त्यांच्यावर एकूण चार शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मंगळवारी दुपारी गोमेकॉत जाऊन नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

श्रीपाद नाईक यांच्या दोन्ही हातांची हाडे मोडली असून एका पायाच्या मांडीचेही हाड मोडले होते. त्यामुळे दोन्ही हात व मांडी मिळून तीन शस्त्रक्रिया त्यांच्यावर कराव्या लागल्या. त्याशिवाय त्यांच्या छातीत नळी बसवण्यासाठीही एक शस्त्रक्रिया करावी लागल्याचे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर असून त्यात सुधारणा होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री सावंत व डीन डॉ. बांदेकर यांनी स्पष्ट केले. श्रीपाद यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेतले. तद्नंतर सावंत यांनी गोमेकॉतील डॉक्टरांची एक बैठक घेऊन श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या अपघातात जखमी झालेले श्रीपाद नाईक यांच्या गाडीचे चालक सूरज नाईक व सुरक्षा कर्मचारी साईकिरण पाटील यांचीही प्रकृती सुधारत असल्याची माहिती गोमेकॉच्या प्रांगणातून पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली. सूरज यांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा असून पाटील यांचे हाड मोडलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
डीन डॉ. बांदेकर हे यावेळी म्हणाले की, श्रीपाद नाईक यांना सोमवारी रात्री जेव्हा गोमेकॉत आणण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती बरीच गंभीर होती. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

हितचिंतकांनी विचारपूस
करण्यास येऊ नये
श्रीपाद नाईक यांचे हितचिंतक, कार्यकर्ते तसेच नातलग आदींनी श्रीपाद यांची विचारपूस करण्यासाठी गोमेकॉत येऊ नये. कुणालाही त्यांना भेटू दिले जाणार नाही. जंतू संसर्ग होऊ नये यासाठी कुणालाही भेटू न देण्याची सूचना डॉक्टरांनी केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, श्रीपाद नाईक यांच्या हितचिंतकांनी सोमवारी रात्रीपासूनच गोमेकॉबाहेर गर्दी केली होती. मंगळवारीही गोमेकॉबाहेर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र, मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व अन्य काही मोजक्या नेत्यांना सोडल्यास अन्य कुणालाही श्रीपाद नाईक हे उपचार घेत असलेल्या ठिकाणी जाण्यास परवानगी नव्हती. श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीसाठी हितचिंतक व कार्यकर्ते हे गोमेकॉ प्रांगणात देवाला साकडे घालत होते.

श्रीपाद यांच्यावर चार शस्त्रक्रिया
गोमेकॉतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीपाद नाईक यांच्यावर मंगळवारी पहाटे २ ते ७ या दरम्यान चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डीन डॉ. बांदेकर यांच्या म्हणण्यानुसार या शस्त्रक्रियांनंतर श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत बर्‍यापैकी सुधारणा दिसून आलेली असून ते उपचारासाठी चांगला प्रतिसाद देऊ लागलेले आहेत. उपचार करणार्‍या डॉक्टरांशी ते बोलल्याचेही बांदेकर म्हणाले. तसेच आता चिंतेचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

विजया नाईक यांचा मृतदेह गोव्यात आणला
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचे पार्थिव काल गोव्यात आणण्यात आले. मात्र, पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. ते कधी केले जातील ते नंतर कळवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या अपघातात नाईक यांचे लातूरस्थित जवळचे मित्र डॉ. दीपक घुमे यांचाही अपघातात मृत्यू झाला होता. डॉ. घुमे हे आरोग्य भारतीचे प्रचारक होते.