श्रीपाद नाईक पुढील निवडणूक लढणार

0
10

>> अफवांच्या पार्श्‍वभूमीवर दिले स्पष्टीकरण

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत पत्रकारांशी बोलताना काल दिले.

केंद्रीय मंत्री नाईक यांच्या वाहनाला कर्नाटक राज्यात झालेल्या भीषण अपघातानंतर ते आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत, अशी चर्चा सुरू आहे. या अपघातात केंद्रीय मंत्री नाईक यांची पत्नी विजया नाईक आणि स्वीय सचिवाचे निधन झाले होते. केंद्रीय मंत्री नाईक निवडणूक लढविणार नसल्याचे गृहीत धरून काही जणांनी भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री नाईक यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करून चुकीची माहिती पसरविणार्‍यांना सणसणीत चपराक दिली आहे.

मतदारसंघात फिरताना बर्‍याच नागरिकांकडून आगामी निवडणूक लढविण्याबाबत विचारणा केली जात आहे. आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी अफवा काही जणांकडून पसरविण्यात येत आहे. आपण डिचोली तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना निवडणूक लढविण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, असेही नाईक म्हणाले.

कर्नाटकातील भीषण अपघातानंतर आपण निवडणूक लढविणार नाही, अशी स्वप्न कोणी बघू नये. भाजपच्या माध्यमातून जीवनाच्या अखेरपर्यंत समाजसेवेचे कार्य सुरू राहणार आहे. उत्तर गोव्यातील नागरिकांनी आत्तापर्यंत जनसेवेची संधी दिली आहे. यापुढेही नागरिकांचे सहकार्य मिळेल.

  • श्रीपाद नाईक, खासदार, उत्तर गोवा.