भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने काल गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली. मागील आठवड्यात आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने डेन्मार्क ओपन सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धेच्या विजेतेपदानंतर चार क्रमांकांची झेप घेतली.
२५ वर्षीय श्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये आहे. यंदा सुपर सीरिज दर्जाच्या चार स्पर्धांच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना यातील तीन त्याने आपल्या नावे केल्या आहे. श्रीकांतच्या खात्यात ६६९२३ गुणांची नोंद आहे. व्हिक्टर एक्सेलसन, सोन वान हो वललिन डान यांच्यानंतर श्रीकांतचा क्रमांक लागतो. २०१५ साली श्रीकांतने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसर्या स्थानापर्यंत मजल मारली होती. एच.एस प्रणॉय याने दोन स्थाने वर सरकताना कारकिर्दीतील सर्वोत्तम १२वा क्रमांक मिळविला तर समीर वर्माने १८वे स्थान प्राप्त केले. खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजय जयराम याची २३व्या स्थानी घसरण झाली आहे. महिलांमध्ये पी.व्ही. सिंधूचे दुसरे स्थान कायम आहे. तर सायनाने १२व्या स्थानावरून ११व्या स्थानावर हक्क सांगितला आहे.
गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईने तीन क्रमांकांची उडी घेत १४७वा क्रमांक मिळविला आहे. तिच्या खात्यात १०,२३० गुण आहेत. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकी रेड्डी व चिराग शेट्टी सर्वोत्तम स्थानावरील भारतीय जोडी आहे. त्याचा ३२वा क्रमांक लागतो. महिला दुहेरीत एका स्थानाच्या नुकसानीसह अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी ही जोडी २३व्या स्थानी आली आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांनी एका स्थानाने प्रगती साधत १६वा क्रमांक आपल्या नावे केला आहे.
काही अन्य भारतीयांची कामगिरी ः पुरुष एकेरी ः साई प्रणिथ (+ १, १५वे स्थान), सौरभ वर्मा (४१वे स्थान), पारुपल्ली कश्यप (-१, ४७वे स्थान), महिला एकेरी ः रितुपर्ण दास (-१, ५०वे स्थान), श्रीकृष्णप्रिया कुदरावल्ली (+ २, ५८वे स्थान).