श्रावणमासातील उपवास व आरोग्य

0
1234

– डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)

सर्वतोपरी आहार-विहाराचे नियोजन करून श्रावण मासातील ‘उपवास’ करुया. योग्य आहार-विहाराचे नियोजन करून केलेले श्रावण महिन्यातील उपवास हे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आहेत.. त्यांच्याकडे डोळसपणे पहा!!

मुळातच या महिन्यात आहारामध्ये बदल हा आरोग्याच्या दृष्टीने केलेला आहे. पण देवाचा आधार घेऊन सांगितल्यास मनुष्य त्याचे पालन प्रामाणिकपणे करतो.

श्रावण महिन्यामध्ये मुळातच निसर्गतः भूक लागत नाही. शरीरातील जाठराग्नी मंद झालेला असतो. शरीरही दुर्बल झालेले असते. तसेच मनावर तामसी भावांचे आवरण आलेले असते. सारखा आळस येतो. परत परत झोपण्याची इच्छा होते.

श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्ये, उपास-तापास, सणवारांचा महिना. आपल्यापैकी बरेच जण हा महिना पूर्ण शाकाहाराचे सेवन करून घालवतात. बरं, यामध्ये होते असे की पूर्णतया शाकाहार सेवन करण्याची सवय नसल्याने जेवण जात नाही. मग जरा चटपटीत, तळलेल्या पदार्थांकडे मनुष्य जास्त ओढ घेतो व यातून आरोग्य बिघडू लागते. खरे पाहता मनुष्यप्राणी हा पापभिरू, धार्मिक असल्याने या महिन्यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत. मुळातच या महिन्यात आहारामध्ये बदल हा आरोग्याच्या दृष्टीने केलेला आहे. पण देवाचा आधार घेऊन सांगितल्यास मनुष्य त्याचे पालन प्रामाणिकपणे करतो.

श्रावण महिना – व्रत-वैकल्ये (उपवास) आणि आरोग्य यांचा कसा काय संबंध असा प्रश्‍न प्रत्येकालाच पडला असेल. त्यासाठी प्रथम आपण आरोग्याची लक्षणे पाहू.
– अन्न खाण्याची इच्छा (अन्नाभिलाषा)
– खाल्लेल्या अन्नाचे सुखपूर्वक, काहीही त्रास न होता पचन होणे (भुक्तस्य सुखेन परिपाकः)
– मल-मूत्र प्रवृत्ती व्यवस्थित होणे, वात सरणे (सृष्टविण्मूत्रवातत्वं)
– शरीरात हलकेपणा व उत्साह अनुभूत होणे (शरीरस्य लाघवं)
– सर्व इंद्रिये प्रसन्न असणे (सुप्रसन्नेंद्रियत्वं)
– झोप लगेच व शांत येणे व वेळेवर सहज जाग येणे (सुखस्वप्न प्रबोधनं)
– शरीरशक्ती चांगली असणे, कांती उत्तम व तेजस्वी असणे. दीर्घायुष्याचा लाभ होणे (बलवर्णायुषां लाभः)
– मन आनंदी, उत्साही व शांत असणे (सौमनस्यं)
– अग्नि समान अवस्थेत असणे (समाग्निता)

भूक चांगली लागली की अन्न खाण्याची इच्छा होते. अन्न आनंदाने खाल्ल्यास अन्नाचे पचन नीट होते. पचन व्यवस्थित झाल्यास शरीराला ऊर्जा मिळते, मनाला स्फूर्ती मिळते, इंद्रिये प्रसन्न होतात व एकूणच शरीर व मनाला बल (पुष्टी) प्राप्त होऊन आरोग्याचा लाभ होतो.

पण श्रावण महिन्यामध्ये मुळातच निसर्गतः भूक लागत नाही. शरीरातील जाठराग्नी मंद झालेला असतो. शरीरही दुर्बल झालेले असते. तसेच मनावर तामसी भावांचे आवरण आलेले असते. सारखा आळस येतो. परत परत झोपण्याची इच्छा होते. मग अशा अवस्थेत काय कराल??
म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये या काळात लंघन सांगितले आहे. लंघन म्हणजे उपवास. या उपवासाला धार्मिकतेची जोड दिल्यास आपण योग्य तर्‍हेने पार पाडू असा समज असल्याने या महिन्यात उपवास सांगितला आहे.

‘उपवास’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘उपास’ हा शब्द तयार झाला आणि इथेच सारी गफलत झाली. हा उपासच आरोग्यास हानिकारक ठरला कारण लोकांनी अज्ञानाने त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना केल्या. काही दिवसभर फक्त पाणी पिऊन रात्री पोटभर जेवायला लागले. काही फक्त चहाच पिऊ लागले. आणि आत्ता उपास म्हणजे साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, रताळी, वेगवेगळे चीप्स, भाजलेले शेंगदाणे, शेंगदाण्याचे लाडू, बटाट्याचा चिवडा, साबुदाणा चिवडा… व हे सगळे कमीच म्हणून की काय उपासाचे वडे, उपासाच्या इडल्या, उपासाचे घावन अशा नवनवीन कलाकृती खाद्यपदार्थांमध्ये वाढू लागल्या आहेत. या अशा प्रकारच्या उपासामुळे पित्त वाढणे, डोकेदुखी, चिडचिड वाढणे, आळस येणे, झोप येणे अशा शारीरिक-मानसिक तक्रारी उद्भवतात व आरोग्य बिघडते.

उपवास म्हणजे काय?….

‘उपवास’ हा मूळ शब्द. ‘उप’ म्हणजे जवळ. ‘वास’ हा मूळ शब्द ‘वस’ या धातूपासून आला आहे. ‘वास’ म्हणजे राहणे, वस्ती करणे. उपवास म्हणजे जवळ राहणे. देवाच्या जास्तीत जास्त जवळ राहणे, यासाठी केलेले व्रत म्हणजे उपवास.
भौतिक गोष्टींपासून लांब राहून म्हणजेच जेवण, खाणे, मनोरंजनादी गोष्टींपासून लक्ष बाजूला करून देवाच्या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून त्याच्या जवळ राहण्याचा मार्ग म्हणजे उपवास. ही उपवासाची खरी संकल्पना. पण प्रत्यक्षात मात्र लोकांना असे वाटते की अजिबात अन्नाचा कणही न खाता राहणे, पाणी न पिता राहणे म्हणजे उत्तम ‘उपवास’ होय. मग असे असल्यास आपल्या देशात कितीतरी भिकारी दिवसेंदिवस उपाशी असतात, म्हणजे ते उत्कृष्ट उपवास करतात काय? नाही. तो उपवास नसून उपासमारी होय.

श्रावण मासातील उपवासाचा प्रथम आध्यात्मिकदृष्ट्या विचार करू. सत्त्व, रज, तम असे मनाचे तीन गुण सांगितले आहेत. देवाच्या अधिकाधिक जवळ जायचे झाल्यास मनाचा ‘सात्त्विक’ गुण वाढवणे गरजेचे असते. पण श्रावण महिन्यात तर मनाचा तामसी गुण वाढलेला असतो. तामसी गुणांवर विजय मिळविण्यासाठी मनाचा सात्त्विक गुण वाढवणे अत्यंत गरजेचे असते. सात्विक गुण हा सात्विक गुणधर्माच्या आहार-आचार-विचारानेच वाढतो. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋषीमुनींनी दूध-तूप-दही-ताक-लोणी-कंदमुळे-विविध फले-सुकामेवा यांचा समावेश उपवासाच्या दृष्टीने सात्त्विक ठरणार्‍या आहारात केला आहे, जेणे करून पचायला हलका व शर्‍ीर बल राखले जाईल. म्हणजे ईश्‍वरभक्तीमध्ये बाधा येणार नाही. अन्यथा आपण सध्या जे पदार्थ ‘उपवासा’चे म्हणून खातो त्यामुळे ईश्‍वरभक्ती सोडाच, ती खूप दूरची गोष्ट, आपले आरोग्य मात्र आपण बिघडवून घेतो.

आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यानंतर आता वैद्यकीयदृष्ट्या ‘उपवासा’चा विचार करू. वैद्यकीयदृष्ट्या उपवास म्हणजे पोटाला आराम. म्हणजेच लंघन करणे. लंघन म्हणजे इथे पूर्णतया उपाशी राहणे बिलकुल नाही. लंघन म्हणजे पचायला हलका असा आहार सेवन करून अग्नी प्रदीप्त करणे. म्हणजेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता उपवासाची खालीलप्रमाणे परिभाषा करायला हरकत नाही.
* पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पाडणारे पदार्थ ठरावीक दिवशी आहारातून बाद करणे. उदा. तळलेले पदार्थ, पिष्टमय, कर्बोदके जास्त असणारे पदार्थ (मैदा, साबुदाणा, शेंगदाणा), साखरेचे पदार्थ.
* दिवसाचा आहार चार भागात विभागणे. सकाळची न्याहरी, दुपारचे जेवण, संध्याकाळी न्याहरी व रात्रीचे जेवण. सकाळच्या न्याहरीसाठी गूळ, मध, खजूरसारखे गोड पदार्थ वापरून केलेल्या खिरी, पातळ पेज, दूध इत्यादी.
* दुपारी उपवासाला चालणार्‍या भाज्या – कंदमुळं, लाल भोपळा, ऋषीपंचमीची भाजी, वरीचे तांदूळ, काकडीची कोशिंबीर, गोड ताजे ताक.
* संध्याकाळी उकडलेली कंदमुळे, पेय- नारळ पाणी, सरबतं.
* रात्री फलाहार. पण रात्री उपवास सोडायचा असल्यास अगदी हलका आहार घ्यावा. त्यासाठी खिचडी, वरण-भात-तूप असा आहार घेऊ शकता.
* दिवस जसजसा कमी होतो त्याप्रमाणे आहाराची मात्रा कमी स्वरूपात घेणे म्हणजेच प्रमाणतः व गुणधर्मानुसार या अनुषंगाने अपेक्षित आहे.
* या ठिकाणी संध्याकाळचा भाग महत्त्वाचा आहे. कारण या वेळेत पोटात शर्करायुक्त व कर्बोदकयुक्त आहार योग्य प्रमाणात मिळाल्याने थकवा जाणवत नाही. व त्याप्रमाणे रात्रीचे जेवण हलक्या मात्रेत व लघू पचायला हलक्या स्वरूपाचे घेतल्यास अपचनाचा त्रास होत नाही.
* उपवासात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोटाला आवश्यक तेवढेच खावे… पोट भरेपर्यंत नव्हे!
* अशा प्रकारच्या उपवासाने मुख्यतः पचनसंस्थेवर कायम पडणारा ताण नक्कीच कमी होतो. दुसर्‍या दिवसापासून पचनसंस्था अधिक जोमाने काम करू शकते.
तसेच श्रावण महिन्यामध्ये शाकाहाराला महत्त्व देण्याचे कारण मुळातच मांसाहार हा पचायला जड व मनाचे रज, तम गुण वाढवणारा आहार आहे. श्रावण महिन्यात अग्नीला प्रदीप्त करणारा व पचायला हलका अशा आहाराची गरज असते. म्हणून शाकाहार सेवन करणेच योग्य!

कसा असावा आहार?….
– ताजे, हलके व गरम अन्न सेवन करावे.
– पचनशक्ती मंदावलेली असल्याने कमी खावे. दिवसातून दोन वेळा व भूक असेल तेवढेच जेवावे. भूक नसताना खाऊ नये.
– ज्यांना फारशी भूक लागत नाही त्यांनी या काळात एकभुक्त रहावे. दुपारी साधे जेवण जेवून रात्री काहीही खाऊ नये किंवा रात्री फक्त मुगाचे कढण, सूप, रव्याची पातळ लापशी, फलाहार, द्रवाहार घ्यावा.
– सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात लिंबाचे सरबत प्यावे. पाणी चांगले उकळून व शक्यतो गरम संपूर्ण दिवस घ्यावे.
– तांदळाचा भाग. मूग-तांदळाची खिचडी, गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी असा आहार घ्यावा.
– कडधान्यांपैकी मूग, तूर, कुळीथ वापरावे. भाज्यांमध्ये दुधी, दोडका घोसाळी, पडवळ, तोंडली, काकडी, माठ व बटाटा यांचा नियमित वापर करावा.
– मंद झालेल्या अग्नीला प्रज्वलीत करण्यासाठी जिरे, हिंग, धने, दालचिनी, तमालपत्र, आले, हळद, आमसूल अशा पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
– तोंडाला चव येण्यासाठी पदिना, कोथिंबीर, लिंबू, आले, ओले खोबरे इ.पासून केलेली चटणी खावी. आले, लिंबू, ओली हळद यांपासून तयार केलेले लोणचे खावे.
– ताज्या ताकांत आले, ओव्याची पूड, चिमूटभर हिंग व काळे मीठ टाकून प्यावे.
– जेवणानंतर मुखवास म्हणून ओवा, बडीशेप, धन्याची डाळ, यांचे सैंधव मिठासह भाजून केलेले मिश्रण वापरावे.
मग चला तर अशा तर्‍हेने सर्वतोपरी आहार-विहाराचे नियोजन करून श्रावण मासातील ‘उपवास’ करुया. योग्य आहार-विहाराचे नियोजन करून केलेले श्रावण महिन्यातील उपवास हे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आहेत.. त्यांच्याकडे डोळसपणे पहा!!