नुकत्याच सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्पामध्ये शिरगावच्या श्रीलईराईच्या प्रसिद्ध जत्रोत्सवास ‘राज्य उत्सव’ दर्जा देण्याची झालेली घोषणा देवस्थानच्या महाजनांनी फेटाळून लावली आहे. श्रीलईराईच्या महाजनांच्या सभेत त्या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्यात आला. वास्तविक, अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी देवस्थानच्या महाजन मंडळाची सरकारने पूर्वसंमती घेणे गरजेचे होते, ती घेतलेली दिसत नाही. अन्यथा अर्थसंकल्पात स्वतः मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होऊन गेल्यानंतर महाजनांचा विरोध होऊन सरकारला अशा प्रकारे नामुष्कीला सामोरे जावे लागले नसते. लईराईचे देवस्थान हे महाजनी व्यवस्थेखाली येत असल्याने महाजनांना देवीच्या उत्सवासंबंधी निर्णय घेण्याचा निश्चितपणे अधिकार आहे व तो त्यांनी राज्य सरकारच्या प्रस्तावास विरोध करून बजावला आहे. श्री लईराईची जत्रा तेथील धगधगत्या ‘होमखणा’तून जाणाऱ्या भाविकांमुळे गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेर सर्वदूर प्रसिद्ध आहे. गोव्यातील ही सर्वांत मोठी जत्रा आहे. त्यामुळे तिचे महत्त्व वाढवण्यासाठी तिला मुळात ‘राज्य दर्जा’ची वगैरेची काही आवश्यकता नाही. ती केव्हाच त्या दर्जाला जाऊन पोहोचलेली आहे. श्रीलईराईचे देवस्थान हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. मुळात तिच्या शिरगाव गावालाच शूचितेची एक परंपरा आहे. गावामध्ये कुक्कुटपालन, वराहपालन वगैरे अजिबात होत नाही. मासळी सोडल्यास इतर मांसाहार पूर्णतः वर्ज्य आहे. गावात दारूचा गुत्ता नाही. श्री लईराईचे भक्त सोवळे, सात्विक जीवन जगत असतात. केवळ शिरगाव गावातीलच नव्हेत, तर श्रीलईराईचे भक्त जेथे जेथे पसरले आहेत, तेथे तेथे जत्रोत्सवाच्या काळामध्ये ते अत्यंत कडक सोवळे पाळतात आणि देवीचा जयघोष करीत हातातली गोंडेदार वेतकाठ्या नाचवीत शिरगावकडे ह्या ‘धोंडां’ची पावले वळतात. व्रतस्थ राहून, ठिकठिकाणाहून पायी चालून श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपल्या सायबिणीच्या भेटीच्या ओढीने येणाऱ्या ह्या लाखो यात्रेकरूंसाठी सोयीसुविधा सरकारने जरूर उभाराव्यात. परंतु त्यासाठी राज्य उत्सव वगैरे गाजावाजा करण्याची आणि त्या जत्रोत्सवाचा बाजार मांडण्याची काही आवश्यकता नाही. श्रीलईराई जत्रेला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यामागे अर्थातच पर्यटनदृष्ट्या तिचा लाभ उठवण्याचा विचार असावा. परंतु ही जत्रा श्रद्धायुक्त अंतःकरणाने भरते. पावित्र्य हा ह्या जत्रोत्सवाचा गाभा आहे. देशी विदेशी पर्यटकांना तेथील होमखण दाखवण्यासाठी आणले गेले, तर हे पावित्र्य टिकणार नाही. येथे येणाऱ्याने श्रद्धायुक्त अंतःकरणाने यावे अशी अपेक्षा आहे. नुसती मौज बघायला नव्हे. आज पर्यटनामुळे अनेक प्रसिद्ध देवळांमध्ये अक्षरशः बाजार मांडला गेला आहे. शेवटी पर्यटकांसाठी देवळात येताना पेहरावाचे काही संकेत जाहीर करण्याची पाळी राज्यातील देवस्थान समित्यांवर आली. भावभक्तीने येणाऱ्याने मंदिरात जरूर यावे, परंतु श्रद्धेचा अंश नसताना केवळ ‘इन्स्टा रील’ करण्यासाठी मंदिरात येणाऱ्यांच्या भाऊगर्दीवर नियंत्रण हवेच. शिरगावच्या जत्रेत जिवाची पर्वा न करता केवळ सायबिणीवर श्रद्धा ठेवून हजारो भाविक धगधगत्या निखाऱ्यांतून होमखणातून चालत जातात. एवढी त्यांची श्रद्धा जाज्वल्य असते. एवढ्या मोठ्या संख्येने येथे अग्निप्रवेश होऊनही कोणी कधी दगावल्याचे एकही उदाहरण नाही. पोर्तुगीज काळात ह्या उत्सवाला आडकाठी आणण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा देखील हा उत्सव विनाअडथळा पार पडलेला आहे. त्यामुळे अशा उत्सवाची महती सरकारने सर्वदूर जरूर पोहोचवावी, परंतु ह्या देवस्थानाच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये. शिरगावचे ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि महाजन वर्षानुवर्षे देवीचे उत्सव शिस्तीत पार पाडत असतात आणि ते त्याला नक्कीच समर्थ आहेत. सरकारने फार तर देवस्थान समितीला भाविकांच्या सोयीसुविधांसाठी निधी पुरवावा, खाणींनी उद्ध्वस्त झालेल्या ह्या गावात मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात. यात्रेकरूंच्या सोयीसाठी योजना आखाव्यात. मात्र, राज्य उत्सवाचा दर्जा देण्याच्या बहाण्याने श्रीलईराईच्या सर्वदूर पसरलेल्या भक्तांच्या आणि यात्रेकरूंच्या एका मोठ्या मतपेढीला खूश करून आगामी निवडणुकीसाठी आपल्या मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करू नये. राज्य दर्जा बहालीमागे तो स्वार्थी भाव अधिक दिसतो. श्रीलईराईचे मंदिर हे एक अनोखे मंदिर आहे. येेथे देवीची मूर्ती नाही. देवी लईराई कलशरूपाने आहे. कलशातील पाण्याला मोगऱ्याचा सुवास आहे. खाण व्यवसायाने मात्र गावाला आणि भक्तांना पाण्याला मोताद केले आहे. सरकारला देवीच्या भक्तांची खरोखर चिंता असेल तर शिरगाव गावापुढील ह्या समस्या दूर कराव्यात. हा गाव सर्वांगसुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. श्रीलईराईच्या भक्तांना निरपेक्ष भावनेतून साह्य करावे, निव्वळ मतांच्या आशेने नव्हे.