- अंजली आमोणकर
‘धाक व भीती नाही तिथे शिस्त नाही’ या उक्तीनुसार ‘अमुक एक गोष्ट केली नाही तर अमुक वाईट होतं…’ असं चक्क धमकावलं जातं, आणि सणांच्या दिवसांत हे ‘शास्त्र’ प्रकरण ‘कुलाचार’, ‘परंपरा’, ‘रीतीरिवाज’ अशा नागमोडी वाटांवरून प्रवास करत-करत गळ्यात पडत राहतं…
आपण सगळे सुशिक्षित लोक. मागच्या अनेक पिढ्यांसारखे अर्धशिक्षित किंवा पुरेच अशिक्षित नाही. अंधविश्वासू तर नाहीच नाही. प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आपण विज्ञानाच्या कसोटीवर घासूनपुसून बघणार. पुरावे देणारी शास्त्रेच आपण मान्य करतो, खरी मानतो. त्यामुळे वरवर बोलताना तरी सगळे आपला ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही, असं म्हणतात. (पण खरं तर ही ‘विश्वास नसणारी’ माणसेच भविष्य, कुंडल्या, शांती, पूजापाठाच्या मागे लागलेली असतात.) ‘नीटपैकी उत्पत्ती-निर्मिती कळल्याशिवाय आपण काहीही करायला तयार असत नाही…’ वगैरे वगैरे कौतुक जरी आपण आपल्या पिढीचे करत असलो तरी तरुण पिढीप्रमाणे आपण सर्वच काही (शकून, अपशकून, श्राद्धपक्ष, पुनर्जन्म, पत्रिका, ग्रहतार्यांच्या महादशा, साडेसाती, नवस, उपास, व्रतवैकल्ये, रीतीरिवाज, सणवार, नियम-कानून) पूर्णपणे स्वीकारूही शकलेलो नाही किंवा झटकूनही टाकू शकलेलो नाही. त्यांत नियम-कानून यांनी तर फारच धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जाती, प्रदेश, भाषा, धर्माप्रमाणे कायदेकानून बदलत राहतात. वहिवाट, परंपरा, समजुती, शकून-अपशकून या कायदे-कानुनात मोडतात. अगदी शनिवारी तेल, मीठ, धातूच्या वस्तू विकत घेऊ नयेत, शुक्रवारी कोणाला पैसे देऊ नयेत, अमावस्येला प्रवास करू नये… शनिवारी व अमावस्येला केस-नखं कापू नयेत… नवं काम सुरू करू नये… अशा हजार गोष्टींचे हजार नियम!! त्यामागचा कार्यकारण भाव काय? तर काहीच सांगता येत नाही. काही काही नियम- विटाळ, सुतक, सुयेरबाबतीतले- कदाचित स्वच्छता व आरोग्य नीट टिकावे या दृष्टीने बनवले असतीलही; पण आजच्या मितीला त्यांचे पालन करणे अत्यंत अवघड व गैरसोयीचे बनले आहे. त्यातही प्रौढ पिढीच्या (आता ज्यांचे वय ५० च्यावर आहे) लोकांच्या मनाची तर फारच विचित्र कुतरओढ चालली आहे. शिक्षित असल्यामुळे विज्ञान, वैद्यकी, भूगोल, अंतराळ याबद्दल सविस्तर माहिती सर्वांनाच असल्यामुळे ना धड कशावरच पूर्ण विश्वास ठेवता येतो, ना सर्वकाही झूट म्हणता येतं. करावं काय? मग आपण काय करतो? आपण सर्वांतून एक मध्यमार्ग शोधायचा प्रयत्न करतो व त्या अदृश्य मध्यमार्गाला गोंडस नाव देतो- ‘शास्त्र’- ‘वहिवाट’- ‘परंपरा.’ आपल्या सोयीनुसार आपण वाकवतो, वळवतो, प्रसंगी रिनोवेट करतो. खरी शास्त्रं कोणी वाचलीयेत? शास्त्रं तर सोडाच, कारण ती प्रकांड पंडितांनासुद्धा कळायला शतके लागली. त्यांत त्यातली अर्ध्याहून अधिक परकीयांनी पळवून नेली. पण जी हाताशी आहेत, त्या मुळात संस्कृतात असलेल्या व मोडी वा तत्सम लिपीत लिहिलेल्या शास्त्रावरील मराठी मीमांसा तरी आपण वाचली आहे काय? मुळीच नाही!
मग, हे बरोबर- ते चूक असं ठरवणार कोण? (इथे मी फलज्योतिष बाजूला ठेवते. ती शास्त्रं- तो अभ्यास- त्याबद्दल विश्वास/अविश्वास, त्यांतील होरे, पुरावे, ग्रंथ, उपाय- हे सर्व वेगळंच गहन शास्त्र आहे.) इथे फक्त दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या, समजुती-गैरसमजुती, शकून-अपशकुनांचे नियम वगैरेंबद्दलचा आपण विचार करतोय. आपण ज्याबद्दल बोलतोय त्याबद्दल आपल्या स्पेशल शास्त्राचे निर्माते जनक आपलेच दोन पिढ्यांपूर्वीचे पूर्वज असतात. जनमानसाला शिस्त लागावी म्हणून त्यांनी शास्त्राच्या नावाखाली (क्वचित परंपरा-वहिवाटीच्या नावाखाली) अनेक नियम तयार केलेले असतात. (ही मात्र फार मौलिक गोष्ट असते) व ‘धाक व भीती नाही तिथे शिस्त नाही’ या उक्तीनुसार ‘अमुक एक गोष्ट केली नाही तर अमुक वाईट होतं…’ असं पण चक्क धमकावलेलं असतं. सणांच्या दिवसांत हे ‘शास्त्र’ प्रकरण ‘कुलाचार’, ‘परंपरा’, ‘रीतीरिवाज’ अशा नागमोडी वाटांवरून प्रवास करत-करत गळ्यात पडत राहतं. घराघरांतले, जातीजातींचे, समाज-समाजाचे अन् मग खास- ‘आमच्यात’ किंवा ‘आमच्याकडे’ म्हणून खास रीतीरिवाज, नियम असतातच. पण जे सर्वांना सामायिक असे रीतीरिवाज तिथेसुद्धा हे शास्त्र अस्तित्वात असते. नरकासुराच्या वधाच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान नाही झाले तर नर्क मिळतो- अशी आपल्याला लहानपणी मिळालेली शिकवण असते. आपल्यातले कितीजण हे पाळतात?
होळीचे रंग खेळायला सर्व तयार; होलिका पूजन कितीजण करतात? नवरात्रात गरबा खेळायला रोज वेगवेगळ्या ठरावीक रंगाचे कपडे घालून सर्व तयार; दुर्गेची पूजा व दर्शन कितीजण करतात वा घेतात? गणपतीच्या दिवसांत भटजी पूजा-आरत्या करून जातात; आपण फक्त सजावट, दारूकाम, जेवणावळीमध्ये गुंतून पडतो. श्राद्धपक्ष तर परस्पर भटजींनाच पैसे देऊन, त्यांच्याकडेच ते करवून घेतले जाते. ‘वेळ नाही’ हे यामागचे कारण सांगितले जाते. ‘पितरांचे अत्मे’- हा एक प्रचंड वादाचा विषय आहे. इथे आस्तिक-नास्तिक हा प्रश्न नाही, प्रश्न आहे शास्त्राच्या पडद्याआड लपून मान्य नसलेल्या व स्वतःस हव्या असलेल्या अनेक गोष्टी करणे, त्याही अर्धवट.
नवसापायी तयार होणार्या जोगतिणी, भाविणी, भस्मे यांच्या जातींची गरज कोणत्या शास्त्रात दाखवली आहे? कोणत्या शास्त्रात त्यांच्यावर केल्या जाणार्या अन्यायाला मान्यता दिली आहे? खरा भक्तिमार्ग (ध्यान, जप, पोथीवाचन, नामस्मरण) सोडून सर्वजण कर्मकांडात (उपास, नवस, सोवळीओवळी) अडकून पडले आहेत. भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीदेखील या गोष्टींना वेडीवाकडी चालना देण्यात जबाबदार आहे. शिवाय आपली मनुष्याची जमात म्हणजे आंधळ्या मेंढरांपेक्षासुद्धा गयीगुजरी. मेंढरं कशी कळपाने सगळ्यात पुढे असलेल्या मेंढरामागे डोळे झाकून जातात, तशी… आपण फक्त मागे जात नाही तर ‘त्या काळी जेव्हा हे नियम वापरात आणले गेले असतील तेव्हाची परिस्थिती, आताची परिस्थिती, तेव्हाची गरज, आताची गरज- असं सर्व तोलूनमापून कालबाह्य गोष्टी बाद करायच्या सोडून त्यांना डोळे झाकून कवटाळून बसतो व गर्तेत उड्या मारतो.
बायकांचे दागिने घालणे, मुलांचे कान टोचणे वगैरे गोष्टींबद्दल हल्ली वैद्यकीय कारणे (ऍक्युप्रेशर पॉईंट्स वगैरे) प्रसिद्ध होत आहेत. तशीच या सर्व समजुतींमागची शास्त्रीय कारणे शोधून काढली तर कोणती चालू ठेवायची, कोणती कालबाह्य मानून सोडून द्यायची, कोणत्या फक्त भ्रामक कल्पना आहेत… कोणत्या गोष्टींचा जाच नवीन पिढीला होऊ द्यायचा नाही… हे सर्व ठरवणे आपल्या पिढीला नक्की सोपे जाईल नाही का?
भानामती, नजर, काला जादू वगैरेसुद्धा अंधश्रद्धाच आहेत. आणि यातून लोकांना वर काढायच्या प्रयत्नातच डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खूनही झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या अनेक संस्था खेडोपाडी जाऊन जागृती करत आहेत. केवळ ‘आमच्या घरात अशीच प्रथा आहे’चा हव्यास धरण्यापेक्षा खर्या अर्थाने सुशिक्षित बनून अंनिसवाल्यांना चिमूटभर मदतच करूया.