शैक्षणिक वर्षातील 10 दिवस दप्तराविना!

0
4

मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा शिक्षण खात्याचा प्रयत्न

शिक्षण खात्याकडून शालेय मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शैक्षणिक वर्षातील 10 दिवस मुलांचे दप्तराविना वर्ग घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे. तसेच, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अन्य काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी काल दिली.

शालेय मुलांना दप्तराचे ओझे सहन करावे लागत आहे. या ओझ्यामुळे मुलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची सूचना करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षातील 10 दिवस ‘नो बॅग डे’ म्हणून पाळले जाणार आहेत. या 10 दिवसांमध्ये मुलांना वर्गाच्या बाहेर नेऊन परिसर किंवा इतर बाबतीत माहिती देण्याचा उपक्रम राबवावा लागणार आहे, असे झिंगडे यांनी स्पष्ट केले.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मुलांना पाठ्यपुस्तकांचे दोन संच वापरण्याची मुभा देण्याची सूचना करण्यात आली आहे. मुलांनी पाठपुस्तकांचे दोन संच बाळगून त्यातील एक संच घरी ठेवावा आणि दुसरा संच वर्गात ठेवावा. त्यामुळे मुलांना घरातून येताना पाठ्यपुस्तके आणावी लागणार नाहीत. शिक्षण खात्याकडून मुलांना दरवर्षी नवीन पाठ्य ुस्तके मुलांना दिली जातात. तसेच, जुन्या पाठ्यपुस्तकांचा एक संच तयार केला जाऊ शकतो. गतवर्षी सहावीच्या वर्गापासून हा प्रयोग करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही शैलेश झिंगडे यांनी सांगितले.