शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी आणि किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी काल राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली. यावेळी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्जही केला. असे असले तरी आंदोलक शेतकरी दिल्लीत मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. सिंघू-टिकरी, शंभू, जिंद आणि अन्य सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात सोमवारी रात्री उशिरा महत्त्वपूर्ण बैठक झाली; परंतु ही बैठक निष्फळ ठरल्याने शेतकरी मोर्चा काढण्यावर ठाम राहिले. चर्चा फिस्कटल्यानंतर पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली.