म्हादई जलतंटा सामंजस्याने सोडवणार

0
6

>> म्हादई प्रवाह प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. एम. स्कॉट यांची माहिती

>> प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर 10 महिन्यांनी पर्वरीत पहिली बैठक

म्हादई प्रवाह प्राधिकरणाची पहिली बैठक पर्वरीत काल घेण्यात आली. प्राधिकरण म्हादई नदी खोऱ्यातील पाण्याच्या शाश्वत आणि न्याय्य वापराबाबत चर्चा करून विचारपूर्वक सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हादई पाणी वाटपाचा तंटा सामंजस्याने सोडवला जाणार आहे, असे प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. एम. स्कॉट यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्राधिकरण म्हादई खोऱ्यातील पाण्याचा शाश्वत समन्यायिक वापराबाबत तोडगा काढणार आहे. तिन्ही राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी म्हादईच्या पाण्याचा सामंजस्याने वापर केला जाणार आहे, असेही स्कॉट यांनी सांगितले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने म्हादई नदीच्या पाण्याचे न्याय्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे पाणी वळवण्याचे प्रकार रोखण्यासाठी म्हादई प्रवाहची (प्रोग्रेसिव्ह रिव्हर अथॉरिटी फॉर वेल्फेअर अँड हार्मनी) स्थापना गेल्या वर्षी मे 2023 मध्ये केली होती. हा प्रवाह अधिसूचित करण्यात आल्यानंतर 10 महिन्यांनी पहिली बैठक पार पडली. या बैठकीला गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत कामकाजाचे नियम तयार करण्यात आले आहेत. म्हादई खोऱ्यातील नद्या आणि उपनद्यांना प्रवाहचे सदस्य भेटी देऊन पाहणी करतील, अशी माहिती स्कॉट यांनी दिली. प्रवाहची पुढील बैठक कर्नाटक किंवा महाराष्ट्रात होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

म्हादई खोऱ्यातून खोऱ्याबाहेरील पाण्याचे हस्तांतरण करण्यासाठी काही परवानग्या दिल्या जाऊ शकतात; परंतु त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन करावे लागणार आहे, असे स्कॉट म्हणाले.