शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याची प्रशासनाची तयारी

0
97

उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाझीपूर येथे गेल्या दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांचे कृषी कायद्यांविरोधात सर्वात मोठे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता मोडीत काढण्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या वतीने आंदोलनात शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सर्व सुविधा बंद करण्यात आल आहेत. सीमेवरील वीज आणि पाणीपुरवठा प्रशासनाने कापला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित आहेत. त्यामुळे गाझीपूर सीमेवर प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत हे आंदोलनावर अद्यापही ठाम आहेत. गाझीपूर येथे त्यांनी उपोषण सुरू केले असून त्यांना जागेवरून हटण्यास पोलिसांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे टिकैत यांना अटक होण्याची शक्यता आहे.

टिकैत यांची आत्महत्येची धमकी
दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चात झालेल्या हिंसाचारप्रकरणी खटला दाखल झाल्यानंतर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी गाझीपूर येथे उपोषण सुरू केले असून शेतकरी विरोधातील कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर आत्महत्या करेन अशी धमकी दिली आहे.

शेतकरी नेत्यांना नोटीस
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी पोलिसांनी २० शेतकरी नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून उत्तरासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे.

बागपतमध्ये कारवाई
उत्तर प्रदेशात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना आजच घरी जावे असे सांगण्यात आले आहे. त्यांची घरी जाण्याची व्यवस्था सरकारने मोफत करेल असे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.
आंदोलकांविरोधात मोर्चा
कृषी कायद्यांविरोधात सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांविरोधात आता या परिसरातील रहिवाशांनी मोर्चा नेत दिल्ली महामार्ग मोकळा करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी निदर्शनेही केली. यावेळी त्यांनी दिल्ली महामार्ग रिकामा करण्याची मागणी आंदोलकांकडे केली.