कळंगुट येथील शॅकमालकांकडून पर्यटकांना केली जाणारी मारहाण व त्यातच एका घटनेत पर्यटकाचा झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर कळंगुट किनाऱ्यावरील शॅक्स रात्री 11 वाजेपर्यंत बंद करण्यासंबंधीच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या समस्येवर काल तोडगा काढण्यात आला. पर्यटकांच्या सुरक्षेवर खास लक्ष ठेवून या किनाऱ्यावरील शॅक्स मध्यरात्री 1 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी त्यांना देण्यात आली.
काल पोलीस महासंचालक आलोक कुमार व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी कळंगुट येथील शॅक व्यावसायिकांबरोबर बैठक घेतली. यावेळी शॅक व्यावसायिकांनी आपले प्रश्न व समस्या मांडल्या. पर्यटकांचे हित जपून त्यांची सुरक्षा धोक्यात येईल असे काहीही केले जाऊ नये, अशी सूचना पोलिसांनी शॅक व्यावसायिकांना केली. त्यानंतर त्यांना शॅक मध्यरात्री 1 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली. पर्यटन खात्यानेही शॅक मालक संघटना, जीवरक्षक व जलक्रीडा व्यावसायिक यांच्यासोबत वेगळी बैठक घेऊन सूचना केल्या.