शुभारंभी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा जिंकणे हे आपले मुख्य ध्येय आणि स्वप्न असल्याचे वास्को येथील टिळक मैदानावर घेण्यात आलेल्या एफसी गोवा संघाच्या पहिल्या सराव सत्रानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्य प्रशिक्षक तथा माजी ब्राझिलियन स्टार फुटबॉलपटू झिको यांनी व्यक्त केले.
झिको आणि साहाय्यक प्रशिक्षक आर्थुर पापाझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघाचे पहिले सराव सत्र काल सायं. ४.३० वा. टिळक मैदानावर टिळक मैदानावर घेण्यात आले. त्यानंतर झिको यांनी पत्रकारांशी संवाद साधला. झिको पुढे म्हणाले की, एफसी गोवा फुटबॉल क्लबसाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या आयएसएल स्पर्धेेत एफसी गोवा संघाचा पहिला सामना १६ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे संघासाठी प्रशिक्षण देण्यास केवळ २८ दिवसांचा अवधी मिळत आहे आणि या २८ दिवसांत गोवा संघाच्या खेळाडूंकडून कसून सराव घेण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याचे झिको म्हणाले.
गोवा आणि पर्यायाने भारतीय खेळाडूंना या स्पर्धेतून बराच मोठा अनुभव आणि लाभ मिळणार आहे. झेक प्रजासत्ताक, फ्रान्स, पोर्तुगालच्या विदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्याचा त्यांना भविष्यात मोठा लाभ होणार आहे. एफसी गोवा संघाने आजचे शुभारंभी सराव सत्र उत्कृष्ट केल्याचे झिको यांनी सांगितले.
सदर पत्रकार परिषदेस एफसी गोवा संघाचे सहमालक श्री. श्रीनिवास धेंपो आणि दत्तराज साळगावकर यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी धेंपो स्पोर्ट्स क्लबचे १४ खेळाडू एफसी गोवाने करारबद्ध केलेले आहेत. त्यात क्लिफर्ड मिरांडा, गॅब्रियल फर्नांडिस, देवव्रत रॉय, लक्ष्मीकांत कट्टमणी, ज्वेल राजा, ऑल्विन जॉर्ज, नारायण दास, मंदरराव देसाई, रोमिओ फर्नांडिस, पीटर कार्वाल्हो, होलिचरण नाझरी, प्रबिर दास, रॉविलसन रॉड्रिगीज, प्रणय हल्दर यांचा समावेश आहे.