- देवेश कु. कडकडे
(डिचोली)
शिवाजी महाराजांमुळे जशी भारतीयांमध्ये परकीय राजवटीविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली, तशीच गोमंतकातील हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम या सर्व धर्मीयांची स्वातंत्र्यलढ्यामागील प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची होती.
शिवाजी महाराज आणि गोमंतक यांचे घनिष्ठ असे नाते आहे. हेच नाते पुढे संभाजी महाराजांनी निरंतर राखले. या पराक्रमी राजांनी पोर्तुगिजांना अनेकदा आपला लष्करी हिसका दाखवला, मात्र, हा पराक्रमी आणि उज्वल इतिहास कधीही शालेय माध्यमातून ठळकपणे शिकवला गेला नाही हे आपल्या गोमंतकाचे दुर्दैव आहे.
गोवा म्हणजे खा, प्या आणि मजा करा, असाच उल्लेख देश-विदेशांत होत असतो. गोव्यात छोटे-मोठे पन्नास किल्ले आहेत. त्यातील काब द राम, खोर्जुवे, जुवे, कोलवाळ, राशोल, नाणूस, थिवी, मर्दनगड या किल्ल्यांची माहिती गोव्यातील युवा पिढीला नाही. आज गोव्यातील स्वराज्यकालीन वास्तू, गड, किल्ले यांची अक्षम्य हेळसांड होत आहे. त्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डिचोली येथील उंच डोंगरावर असलेली ‘निमुजगा’ ही वास्तू संभाजी महाराजांच्या काळात उभारली गेली होती याबद्दल अनेकजण अंधारात आहेत. त्यामुळे या वास्तूचे महत्त्व केवळ धार्मिक स्वरूपाचे राहिले आहे. पोर्तुगीज लोक दर्यावर्दी होते. गोव्यात त्यांनी १५१० सालापासून जे घट्ट पाय रोवले त्याचे उच्चाटन व्हायला १९६१ साल उजाडावे लागले. व्यापारानिमित्त आलेल्या पोर्तुगिजांनी हळूहळू गोव्यातील सासष्टी, बार्देश, तिसवाडी हे तीन तालुके आपल्या ताब्यात घेतले. मंदिर, मशीद पाडून तिथे चर्च उभारल्या. साम, दाम, दंड यांचा वापर करून स्थानिकांचे बळजबरीने धर्मांतर केले. लोक आपली दैवते घेऊन स्थलांतरित होऊ लागले. हा सर्व वृत्तांत शिवाजी महाराजांकडे पोचला होता. ख्रिस्तीकरण केलेल्या भागाला फिरंगाण म्हणत असत. १९६४ पूर्वी गोव्याचा पेडणे, डिचोली, साखळी, सत्तरी, अंत्रुज, अष्टगर, हेमांडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाकडे होता. सह्याद्रीच्या संलग्न असलेला डिचोली सत्तरी, पेडणे, फोंडा आणि आजूबाजूचा काही प्रदेश शिवाजी महाराजांनी स्वराज्याला जोडला. तो प्रदेश गोमंतक म्हणून ओळखला जात असे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि नंतर पेशव्यांनी केलेल्या दक्षिणेकडील स्वार्या गोमंतकातून होऊ लागल्या. पुढे देशभरात इंग्रजी सत्तेचा उदय आणि मराठेशाहीचा अस्त होत गेला, तसे हे प्रदेश पोर्तुगिजांनी आपल्या राज्याला जोडले.
३५२ वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचे कोकणमार्गे गोव्यातील बार्देश तालुक्यातील कोलवाळ गावात आगमन झाले. त्याआधी त्यांनी कोकण भागातून तिथल्या समुद्र किनार्याचे निरीक्षण केले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, पोर्तुगीज, सिद्दी यांची सर्व ताकद ही त्यांच्या सुसज्ज आरमारात आहे. यासाठी पोर्तुगिजांनी मोठ्या हुशारीने खाडीवर किल्ले बांधले होते. महाराजांनी स्वत:चे आरमार उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीज कारागिरांची मदत घेतली. कल्याण, भिवंडी, पेण या ठिकाणी आरमार बांधण्यासाठी जागा निवडली. रुई लॅन्टल वॅगस आणि त्याचा मुलगा फॅरनाड वॅगस यांच्या बरोबर ४०० पोर्तुगीज कारागीर काम करत होते. महाराजांनी आरमार उभारून आपली किनारपट्टी सुरक्षित केली. हेच पोर्तुगीज जसे महाराजांचे आरमार तुल्यबळ होऊ लागले तसे अस्वस्थ झाले आणि त्यांनी महाराजांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरू केली. मात्र, त्यांचे हे धोरण दुटप्पी होते.
गोव्यात कोलवाळ येथे पाऊल टाकताच तिथल्या स्थानिकांनी आपल्या समस्या महाराजांसमोर मांडल्या. महाराजांनी बार्देशवर हल्ला करून थिवी किल्ला ताब्यात घेतला आणि पोर्तुगिजांना हाकलून लावले. तेव्हा पोर्तुगीज गव्हर्नरने महाराजांशी तह करण्यासाठी अधिकारी पाठवले. अनेक जाचक अटी लादून महाराजांनी हा तह मान्य केला. महाराजांचे परकीय व्यापाराबद्दल चांगले मत कधीच नव्हते. हे व्यापारी हळूहळू एखाद्या प्रदेशात घट्ट पाय रोवतात. त्यांची पूर्ण सत्ता उखडून टाकायची असेल, तर पुष्कळ मनुष्यबळ, द्रव्य आणि वेळ खर्च करावा लागेल. अर्थात त्यांनी तसा दोन – तीन वेळा प्रयत्नही केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. मात्र, पोर्तुगीज सत्तेचा विस्तार रोखण्यासाठी स्वतंत्र आरमार उभारून कारवार, शिवेश्वर, अकोले आणि फोंडा किल्ला घेतला. महाराजांनी साळ नदीच्या किनार्यावर बेतूल किल्ला बांधला. महाराजांनी उभारलेला हा गोव्यातील एकमेव सागरी किल्ला होय. हा किल्ला बांधण्याचा हेतू पोर्तुगिजांच्या साळ नदीमार्गे चालणार्या सासष्टीतील जलवाहतुकीवर आवर घालणे हा होता. त्यामुळेच पोर्तुगिजांना अनेक वर्षे आपल्या राज्याचा विस्तार करता आला नाही. पोर्तुगिजांनी महाराजांच्या लष्करी सामर्थ्याचा किती धसका घेतला होता, याचा उल्लेख मुरगाव येथे वास्तव्यास असलेल्या पोर्तुगीज लेखक कोस्मी द ग्वार्द यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे. हे चरित्र १६९५ साली लिहिले आहे.
शिवाजी महाराजांचा गोव्यात डिचोली येथे सध्या जे शिवाजी महाराज मैदान आहे तिथे लष्करी तळ होता आणि आज तिथे मोठे चर्च आहे, तिथे किल्ला होता हे या परिसराचे बारीक निरीक्षण केल्यास लक्षात येते. डिचोलीत महाराजांचा दारूगोळा बनवण्याचा कारखाना होता. डिचोली तालुक्यातील नार्वे गावापासून पोर्तुगिजांची राजधानी जुने गोवे हे तासभराच्या अंतरावर होते. त्यामुळे पोर्तुगिजांवर हल्ला करण्यासाठी नार्वे गावात आपले बस्तान मांडले. महाराजांनी नार्वे गावातील सप्तकोटेश्वर देवालयाचा जीर्णोद्धार केला. याचा उल्लेख ‘श्री शिवरायभिषेककल्पतरू’ या निश्चल पुरीकृत शिवकालीन संस्कृत ग्रंथात मिळतो. शिवाय मंदिराच्या गर्भागाराच्या प्रवेशद्वारावर ‘श्री शिवराय देवालय प्रारंभ’ या अक्षरांचा शिलालेख आहे. महाराजांनी जेव्हा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले ते सप्तकोटेश्वर मंदिर कोकण प्रांतातील सहा मोठ्या मंदिरांपैकी असून ते पुरातन आहे. महाराजांनी मंदिरासाठी सामान जमवण्याच्या निमित्ताने आपली माणसे जुने गोवे शहरात पेरली. याचा सुगावा पोर्तुगिजांना लागल्याने ही मोहीम फत्ते झाली नाही आणि त्यांनी माघार घेतली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी आपली मोठी फौज घेऊन गोव्यावर स्वारी करून जुवे किल्ला घेतला. मांडवी नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच मोगल शाहजादा मोठ्या लष्करी सामर्थ्यानुसार स्वराज्यावर चालून येत असल्याची खबर आली तेव्हा ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. गोव्यातून गाशा गुंडाळण्याच्या वाटेवर असलेल्या पोर्तुगिजांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे गोव्याशी नाते केवळ राजकीय स्वरूपाचे नव्हते, तर ते सामाजिक, सांस्कृतिक बंधनानेे विणलेले होते. इंग्रज आणि पोर्तुगिजांचे वकील आणि दुभाष्याचे काम करणारे नारायण शेणवी हे महाराजांच्या राज्याभिषेकाला हजर होते. त्यांनी जे त्या सोहळ्याचे वर्णन केले होते त्याची नोंद इंग्रज अधिकारी हेन्री आक्सीडेन यांनी केली आहे. या वर्णनानुसार गोमंतकीय सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांनी साकारलेले शिवराज्याभिषेकाचे चित्र हे सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. शिवाजी महाराजांमुळे जशी भारतीयांमध्ये परकीय राजवटीविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली, तशीच गोमंतकातील हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम या सर्व धर्मीयांची स्वातंत्र्यलढ्यामागील प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची होती.