>> आदित्य ठाकरे; वास्कोतील प्रचारसभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
गोव्याचे आणि आपल्या सगळ्यांचे एक वेगळे नाते आहे. कारण महाराष्ट्रातील बर्याच जणांचे कुलदैवत आणि देवस्थान इथे गोव्यातच आहेत. हळूहळू गोवेकरांना शिवसेनेचा दरारा काय असतो आणि शिवसेना म्हणजे नक्की काय हे समजायला लागले आहे. प्रत्येक राज्य, जिल्हा, शहर, गाव तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यायचा म्हणजे नेमके काय करायचे, हे शिवसेनेकडून समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल केले.
आदित्य ठाकरे हे काल दोन दिवसांच्या गोवा दौर्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी वास्को येथे सभा घेऊन कार्यकर्त्यांना व उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना गोवा प्रमुख शैलेंद्र वेलिंगकर उपस्थित होते.
गोव्यात विकासाच्या नावाने फ्लायओव्हर, रस्ते दाखवले जातात; पण हा विकास होतो कुणाचा? कंत्राटदारांचा होतो का लोकांचा होतो? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. केंद्रातील मंत्री आता गोव्यामध्ये येऊन हे करू ते करू असे सांगत आहेत. मग गेली १० वर्षे ती कामे का नाही झालीत? तुमची केंद्रात पण सत्ता आहे आणि इथे पण सत्ता आहे, तरीसुद्धा तुम्ही १० वर्षात कामे का झाली नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला. इथली निवडणूक लढण्याआधी आम्हाला इथल्या लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. आज मी इथे प्रचारासाठी आलो नाही, तर आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे. त्यामुळे शिवसेनेला संधी देऊन विजयी करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.