शिलॉंग लाजॉंगचा १९ वर्षीय युवा मध्यपटू फ्रँकी बुआम एफसी गोवाच्या ताफ्यात सामील झाला आहे. त्याने इंडियन सुपर लीगसाठी एफसी गोवाशी तीन वर्षांचा करार केला आहे.
बुआमने २०१८-१९ मोसमात आयलीग स्पर्धेद्वारे वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. त्यानंतर आपल्या आकर्षक कामगिरीच्या जोरावर तो लगेच प्रसिद्धीच्या झोतात आला. पदार्पणातच त्याने शिलॉंगसाठी ६ गोल नांेंदविले. त्यामुळे तो २०१-१९ आयलीगमध्ये तिसरा सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू ठरला होता, तर लाजॉंगसाठी सर्वोच्च.
एफसी गोवाशी करार केल्यानंतर बोलताना बुआमने, एफसी गोवा संघात सामील होणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब असून मी आनंदी आणि उत्साहित आहे. मला हृदयातून आनंद झालेला असून आता एफसी गोवा संघात मी माझे भवितव्य पाहत आहे. खरे सांगायचे झाले तर गेल्या काही वर्षांत मी एफसी गोव्याचा चाहता बनलो होतो. त्यांची शैली आणि नेहमीच आक्रमण करण्याच्या मानसिकतेमुळे मी त्यांच्याकडे आकर्षिक झालो होतो. मी गेल्या मोसमात एफसी गोवाचा खेळ अगदी जवळून पाहिलेला आहे आणि ज्यावेळी मला सामना चुकला, त्यावेळी तेव्हा संपूर्ण सामन्याचा रिप्ले पाहत होतो. त्यामुळे मला माझे स्वप्न सत्यात उतरत असल्याचे जाणवतेय. आशा करतो मी एफसी गोवा संघात मी माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेन आणि संघाला येत्या काळात यश मिळवून देण्यासाठी माझा वाटा उचलेन, असे बुआमने सांगितले.
मेघालयातील जैंटिया हिल्सचा रहिवासी असलेल्या बुआमने आपल्या कारकिर्दीची सुरुवात रॉयल वॅहिंगडोह संघाद्वारे केली होती. त्यांच्यासाठी तो अंडर-१६ आणि अंडर-१९ संघात खेळला होता. त्यानंतर तो शिलॉंग लाजोंगकडे गेला. त्यावेळी त्याने २०१८मध्ये संघाला अंडर-१९ यूथ लीग (सध्याची यूथ लीग) जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच वर्षी त्याने शिलॉंग लाजॉंगच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविले. शिल्लॉंगची पदावनती झाली तरी बुआमने आपल्या कामगिरीद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या हंगामात शिलॉंग लाजॉंगला शिलॉंग प्रीमियर लीग आणि मेघालय राज्य लीग या दोन्ही स्पर्धा जिंकून देण्यात बुआमने मोलाची कामगिरी बजावली. आपल्या संघाकडून खेळताना तो स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू बनला. त्यानंतर तो बंगळुरू युनायटेड संघात लोनवर सामील झाला आणि द्वितीय विभाग लीगमध्ये खेळताना आणखी चमकला.