जोपर्यंत संशयितांना पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत कुयणामळ, सांगे येथे काजू बागायतीत जळलेल्या स्थितीत सापडलेल्या प्रेताचे अवशेष ताब्यात घेण्यास शांताराम शिरोडकर यांच्या कुटुंबीयांनी काल सक्त नकार दिला. दरम्यान, अद्याप डीएनए अहवाल आला नसल्याने या भागात वातावरण तंग आहे.
काजू बागायतीत सफाई करण्यास गेलेले कुयणामळ येथील शांताराम शिरोडकर सध्या बेपत्ता असून त्यांच्या बागायतीत जळलेल्या स्थितीत एका वृद्धाचे प्रेत रविवारी सापडले होते. प्रेत सापडलेल्या जागेजवळच पोलिसांना चपला, टोपी व कोयता सापडला होता. मात्र, प्रेत ९० टक्के होरपळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे ओळख पटण्यापलीकडे होते. काल पोलिसांना प्रेत सापडलेल्या जागी शांताराम यांच्या घराची चावी व जळलेल्या भ्रमणध्वनीचे सुटे भाग सापडले. त्यामुळे ते शांताराम यांचेच असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शिरोडकर यांच्या कुटुंबीयांनी अज्ञाताने क्रूरपणे खून करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पेट्रोल किंवा डिझेल ओतून जाळण्यात आल्याचा संशय आहे.