‘बॉक्सिंग डे’ कसोटी आजपासून

0
74
England's cricket captain Joe Root bats in the nets during training at the MCG in Melbourne on December 25, 2017. Australia play England in the fourth Ashes Test match starting December 26. / AFP PHOTO / William WEST / -- IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE --

इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून मेलबर्न येथील मैदानावर खेळविण्यात येणार आहे. मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच मालिका ३-० अशी खिशात घातली असून पाहुण्यांवर व्हाईटवॉश लादण्याच्या दिशेने अजून एक पाऊल टाकण्यासाठी त्यांचा संघ सज्ज झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने आत्तापर्यंत तीन बॉक्सिंग डे कसोटींत कांगारूंचे नेतृत्व केले आहे. या तिन्ही कसोटींच्या पहिल्या डावात त्याने अनुक्रमे १९२, नाबाद १३४ व नाबाद १६५ धावा केल्या आहेत. स्मिथचा जबरदस्त फॉर्म पाहता इंग्लंडसाठी चौथी कसोटी जड जाण्याची चिन्हे आहेत. प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नसल्याने डावखुर्‍या वेगवान गोलंदाजाची वैविध्यता त्यांना लाभणार नाही. त्याच्या जागी जॅकसन बर्ड खेळणार आहे.

इंग्लंडच्या संघाची स्थितीदेखील वेगळी नाही. मध्यमगती गोलंदाज क्रेग ओव्हर्टन जायबंदी झाल्याने सरेकडून खेळणारा टॉम करण या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण करणार आहे. फिरकी गोलंदाजीमध्ये मोईन अलीला अपेक्षित कागगिरी करता आलेली नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजांवर अधिक दबाव पडला आहे. फलंदाजी फळीचा विचार केल्यास सलामी जोडी इंग्लंडसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
भरवशाचा सलामीवीर ऍलिस्टर कूकचे अपयश इंग्लंडसाठी मारक ठरत आहे. यंदा मागील १० डावांत त्याला ४० धावांपलीकडे मजल मारता आलेली नाही. तसेच यावर्षी त्याची फलंदाजी सरासरीदेखील ३४.४७ असी साधारण आहे. ३३ वर्षीय कूक याने काल आपला ३३वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे ३४व्या वर्षांत पदार्पण केलेल्या कूक याच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा केली जात आहे.

ऑस्ट्रेलिया संभाव्य ः कॅमरून बॅनक्रॉफ्ट, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, शॉन मार्श, मिचेल मार्श, टिम पेन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, नॅथन लायन व जॅकसन बर्ड.
इंग्लंड संभाव्य ः ऍलिस्टर कूक, मार्क स्टोनमन, जेम्स व्हिन्स, ज्यो रुट, डेव्हिड मलान, जॉनी बॅअरस्टोव, मोईन अली, ख्रिस वोक्स, टॉम करन, स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन.

एमसीजी व २६ डिसेंबर
१९७४-१९७५च्या ऍशेस मालिकेत सहा कसोटी सामन्यांचा समावेश होता. सामन्यांच्या जास्त संख्येमुळे ख्रिसमसच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे २६ डिसेंबरला मेलबर्नवर तिसर्‍या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. एमसीजीवर २६ डिसेंबरला झालेला हा पहिलाच कसोटी सामना होता. यानंतर १९८० पासून नियमितपणे मेलबर्न क्रिकेट मैदानावर २६ डिसेंबर रोजी कसोटी सामना आयोजनाचे सत्र अवलंबले. ही परंपरा आजतागायत सुरू आहे. केवळ १९८९ साली बॉक्सिंग डे दिवशी ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता. पुढील वर्षी भारतीय संघ बॉक्सिंग डे कसोटीत खेळताना दिसणार आहे. २०१३ साली कसोटीच्या पहिल्या दिवशी ९१,११२ लोकांची उपस्थिती नोंद झाली होती.