शिक्षण खात्याने विद्यालयांच्या अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. शिक्षण खात्याचे संचालक संतोष आमोणकर यांनी यासंबंधीचे परिपत्रक काल जारी केले.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयाचे ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. कनेक्टिविटीच्या समस्येमुळे काही विद्यालयांना ऑनलाइन वर्ग घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. काही विद्यालयांनी मुलांचे ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने मूल्यांकन केले आहे. राज्यातील काही विद्यालयांना मुलांचे मूल्यांकन करण्यासाठी जास्त कालावधीची गरज आहे. शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिली ते नववीची पहिला परीक्षा १५ जानेवारी २०२१ पासून, दुसरी परीक्षा एप्रिलच्या अखेरीस घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
दहावी आणि बारावीची पहिली परीक्षा १५ जानेवारीपासून आणि दुसरी परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरीस घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. अंतर्गत परीक्षा घेतलेल्या शाळा या परिपत्रकानुसार गरज भासल्यास पुन्हा मुलांची परीक्षा घेऊ शकतात. पहिला ते नववी आणि अकरावीचा निकाल ८ मे किंवा त्यानंतर जाहीर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
दहावी व बारावीची अंतिम परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.