म्हादईप्रश्‍नी न्यायालयबाह्य तडजोड नाही ः मुख्यमंत्री

0
252

म्हादईप्रश्‍नी गोवा सरकार कर्नाटशी न्यायालयीन लढाईच लढणार असून त्यांच्याशी न्यायालयाबाहेरील तडजोडीचा आमचा कोणताही विचार नाही, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकारांनी म्हादईचे पात्र आता कोरडे पडू लागले आहे ही बाब त्यांच्या नजरेस आणून दिली असता आपणाला त्याची कल्पना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले व गोवा सरकार कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकशी म्हादईप्रश्‍नी कोर्टाबाहेर तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. कर्नाटकने वळवलेले पाणी सोडायला हवे, असेही सावंत यावेळी म्हणाले.

भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनाही आपण म्हादई प्रश्‍नाची कल्पना दिली असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. म्हादई जलतंटा लवादाने दिलेल्या निवाड्याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.

तमनार वीज प्रकल्प हवा
तमनार वीज प्रकल्पासाठी वीजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण केले नाही तर येत्या दोन वर्षांत गोव्यात वीजटंचाई निर्माण होण्याची भीती असल्याचे मुख्मयंत्री म्हणाले. भाजपच्या आमदारांनी लोकांना विकास प्रकल्पांविषयी योग्य ती माहिती द्यायला हवी. तसेच या प्रकल्पांचे फायदे त्यांना पटवून द्यायला हवेत. निवडणुका जवळ आलेल्या असल्याने राजकीय फायद्यासाठी काही लोक या विकासकामांना विरोध करू लागले असल्याचा आरोपही सावंत यांनी केला.

जिल्हा पंचायत निवडणुका
डिसेंबर महिन्यात

जिल्हा पंचायत निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे सावंत यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.

कोळशासंबंधी भूमिका स्पष्ट
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी कोळशासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी, कोळशासंबंधी आपली भूमिका स्पष्ट असून ती यापूर्वीच सांगितली आहे असे सांगितले. ते म्हणाले की, मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आम्ही यापूर्वीच आश्‍वासन दिलेले आहे.त्या शिवाय मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीमुळे जे प्रदूषण होत आहे त्या संबंधीचा अहवाल सादर करण्याचा आदेशही आपण यापूर्वीच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्याला इंडिया टुडेचा पुरस्कार
इंडिया टुडेच्या पुरस्कारांमध्ये छोट्या राज्यांच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून गोव्याला पुरस्कार मिळाला असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सावंत हे यावेळी बोलताना म्हणाले. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला असून आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत राज्याला हा पुरस्कार मिळालेला असल्याने केलेल्या कामाची पावती मिळाल्याचे समाधान असल्याचे सावंत हे यावेळी बोलताना म्हणाले. गोव्याला त्यांनी केलेल्या साधनसुविधा विकास, पर्यटन विकास व अर्थव्यवस्थेतील विकास तसेच स्वच्छता या कामासाठी उत्कृष्ट कामगिरीसाठीचा पुरस्कार लाभला असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय पर्यावरणाविषयी केलेल्या कामासाठी राज्याला अतिसुधारणा केलेले राज्य हाही पुरस्कार मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.