‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या पोवाड्याद्वारे तमाम मराठी मनांच्या घराघरांत पोहोचलेले ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे काल वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते शाहीर साबळे या नावाने परिचित होते. त्यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या साबळे यांना गायकीचा वारसा आईवडलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील माळकरी व वारकरी पंथाचे भजन-कीर्तन करीत असत. त्यांची आई निरक्षर; पण जात्यावर दळताना ओव्या रचणारी व गाणारी होती. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे ते त्यांच्या मामांकडे अमळनेरला गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. मात्र, अमळनेरला त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे बाळकडू आत्मसात करून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत गुरुजींबरोबर त्यांनी जनजागृती केली होती.
महाराष्ट्राच्या विविध भागातील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करणार्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी जनजागृतीसाठी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली होती. महाराष्ट्रात मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासह जनजागृतीसाठी दौरे केले होते.
प्रसिद्ध गीतकार-संगीतकार देवदत्त हा त्यांचा मुलगा, अभिनेत्री चारुशीला साबळे-वाच्छानी ही मुलगी तर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे त्यांचे नातू होत.