रायबरेलीत भीषण रेल्वे अपघातात ३१ ठार

0
126
अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले.

१५० जण गंभीर जखमी
उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या बछरावा रेल्वे स्थानकावर काल सकाळी डेहराडून – वाराणसी जनता एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जण जखमी झाले आहेत. जनता एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरल्याने सकाळी ९.३० च्या दरम्यान ही घटना घडली. इंजिनाच्या चालकाने सिग्नलकडे उल्लंघन केल्यामुळे इंजीन व त्याला लागून असलेले दोन डबे रूळ सोडून खाली घसरल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली आहे. या रेलगाडीला बछरावा स्टेशनवर थांबा होता; मात्र गाडी तिथे थांबली नाही व स्टेशनपासून पुढे जाऊन या रेलगाडीचे डबे रुळावरून घसरले. एक्सप्रेसचे ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी तसेच रेल्वेच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. काही जखमींना गॅस कटरच्या साहाय्याने बोगींमधून कापून बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमींना लखनौच्या एजीपीजीआय व केजीएमयू रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार तसेच किरकोळ जखमींना २० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.