>> अनलॉक ५ मार्गदर्शक सूचना ः १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यास केंद्राची सशर्त परवानगी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानाच केंद्र सकारने आता अनलॉक ५ साठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यावेळी सरकारने विविध अटीही घातल्या आहेत. यानुसार येत्या १५ ऑक्टोबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे.
शाळांसोबतच देशात मल्टिप्लेक्स चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार आहेत. पण सरकारने यासाठी काही अटी घातल्या आहेत. चित्रपटगृहातील प्रेक्षक हे ५० टक्के असावेत अशी अट घालण्यात आली आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्विमिंग पूल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सामाजिक, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना यापूर्वीच जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्ट झोनमधील कठोर लॉकडाउन ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारांनी कंटेन्मेंट झोनच्या बाहेर स्थानिक पातळीवर लॉकडाउन घोषित करू नये असे निर्देश केंद्राने दिलेले असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर मात्र बंदी घालण्यात आलेली नाही. मास्क आणि सॅनिटायझरदेखील अनिवार्य करण्यात आले आहे.
शाळांचा निर्णय राज्यांवर
केंद्र सरकारनं अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात ५० टक्के शिक्षकांना शाळेत बोलावण्यास परवानगी दिली होती. पाचव्या टप्प्यात १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, संबंधित राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे मार्गदर्शन सूचनांमध्ये म्हटले आहे.
चित्रपटगृहास परवानगी
चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, थिअटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देता येईल. प्रेक्षकांना बसवण्यासंदर्भातील नियमावली माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येईल, असे केंद्राने म्हटले आहे.
सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना केंद्रानं अगोदरच परवानगी दिली आहे. मात्र, हे कार्यक्रम कंटेनमेंट झोनमध्ये आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. खेळाडूंसाठी स्वीमिंग पूल सुरू करण्यासही केंद्राने परवानगी दिली आहे. केंद्रीय क्रीडा व युवा मंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल करणे सुरू केले आहे. अनलॉक ४ चा टप्पा संपल्यानंतर काल केंद्र सरकारने अनलॉक ५ ची घोषणा केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. आता हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येत आहे.
पालकांच्या परवानगीने शाळा
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शनक सूचनांमध्ये शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालये जरी १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास सांगितले असले तरी त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी असणे बंधकारक आहे.