शाळा, विद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही

0
69

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असलेली विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालये सुरू करण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे सरकार बारावी इयत्तेपर्यंतची विद्यालये सुरू करण्याचा धोका पत्करू शकत नसल्याचे त्यांनी काल स्पष्ट केले.

राज्यातील १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण झालेले आहे असे सांगून त्यामुळे आम्ही आता राज्यातील बंद असलेली महाविद्यालये सुरू करू देण्याचा विचार चालवला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील महाविद्यालये (अव्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारी) येत्या १ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, १ सप्टेंबर रोजी राज्यातील कोविड स्थिती कशी असेल त्यानुसार महाविद्यालयांना आपले वर्ग सुरू करावेत की नाही त्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांनी, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयातील वर्गात हजेरी लावून शिक्षण घेण्यावर असलेली बंदी यापूर्वीच उठवण्यात आलेली आहे. मात्र, आता सप्टेंबर महिन्यातील परिस्थिती पाहून महाविद्यालयांनाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे, असे म्हटले आहे.

ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटन
सुरू करण्यास सरकार अनुकूल

गोवा सरकार येत्या ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू करण्यास इच्छुक आहे. त्यासाठीची एसओपीही तयार केली जात आहे. मात्र, केंद्र सरकार जोपर्यंत चार्टर विमानांना परवानगी देत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय पर्यटन मोसम राज्यात सुरू होऊ शकणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

गोव्याच्या ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम असोसिएशनच्या एका शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्याची भेट घेऊन येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन मोसम सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची त्यांना विनंती केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. केंद्र सरकार जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत चार्टर विमाने सुरू होऊ शकणार नसल्याचे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वीही आम्ही वरील प्रश्‍नी केंद्रीय गृहमंत्रालय तसेच पर्यटन मंत्रालयाशी संपर्क साधलेला आहे. आता परत एकदा आम्ही ह्या प्रश्‍नी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील कोविड स्थितीचाही पुढील दोन महिने अभ्यास करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.