नवी समीकरणे

0
94

राजधानी काबुलसह अफगाणिस्तानसारख्या विशाल देशावरील तालिबान्यांचा ताबा, त्यानंतर झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीमध्ये विविध देशांंनी मांडलेली भूमिका, अमेरिका, चीन आदी देशांच्या प्रतिक्रिया हे सगळे लक्षात घेतले तर नवी जागतिक समीकरणे उदयास येत असल्याचे स्पष्ट दिसते. अफगाणिस्तानमधील पराभव हा तेथील अश्रफ घनी राजवटीचा तर आहेच, परंतु त्याहून अधिक तो स्वतःला महासत्ता म्हणवणार्‍या अमेरिकेचा आहे. गेली वीस वर्षे तेथे आपले अब्जावधी डॉलर ओतलेल्या आणि आपले जवळजवळ तेवीसशे सैनिक गमावलेल्या अमेरिकेसाठी काबुल विमानतळावरील परवाची दृश्ये ही सर्वांत मोठी नामुष्की आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी भलेपणाचा कितीही आव आणला, तरी ज्या शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध रीतीने त्यांना सत्तेचे हस्तांतर अपेक्षित होते, ते कोठेच दिसले नाही. प्रतिकार न झाल्याने शांतता होती, परंतु तालिबान्यांना सत्ता सुपूर्द करायला आणि पश्तुन तालिबान्यांच्या हाती ती सुपूर्द करीत असताना देशातील ताजिक, उझ्बेक, हजारा आदी गटांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी वाटाघाटी करण्यास कोणी मागे उरलेच नव्हते. त्यामुळे आज सर्वंकष सत्ता पश्तुन तालिबान्यांच्या हाती अनायासे आणि सहजगत्या आलेली आहे.
तालिबानी नेतृत्व स्वतः कतारमध्ये बसून आपले हस्तक विनाप्रतिकार शहरांमागून शहरे ताब्यात घेताना आणि सरतेशेवटी काबुलमधील राष्ट्राध्यक्ष निवास आणि संसद ताब्यात घेताना ‘अल जझिरा’च्या कृपेने थेट पाहात होते. ज्यांनी दोहा करारानुसार त्यांच्याकडे सत्ता सुपूर्द करायची ते अश्रफ घनी स्वतःच्या जिवाच्या भयाने ओमानकडे पळाले, बडे बडे अधिकारी, लष्करी अधिकारी परागंदा झाले आणि बिचारी अफगाण जनता वार्‍यावर पडली. ज्या तर्‍हेने त्या आम जनतेची काहीही करून अफगाणिस्तानबाहेर पडण्याची काबुल विमानतळावर धडपड चालली होती ती अंगावर काटा आणणारी आहे. विमानांना लटकलेले, वरखाली चढून बसलेले हे मानवी जीव तालिबान ही काय चीज आहे ह्याचीच जणू जगाला जाणीव करून देत होते. तालिबानने गेल्यावेळी सत्ता हस्तगत केली तेव्हा मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडलेले तीस लाख नागरिक करझाई आणि नंतर घनी यांच्या राजवटीत देशात परत गेले होते. ते पुन्हा उघड्यावर आले आहेत.
आज तालिबानने मोळा साळसूद चेहरा जरी धारण केलेला असला, तरी अफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात येताच जो कतारमधून जगाला तालिबान्यांकडून सार्वत्रिक माफीच्या, मानवाधिकार जतनाच्या आणि जनतेच्या रक्षणाच्या बाता मारत होता आणि बहुधा ज्याच्याकडेच नव्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे जाणार आहेत, तो तालिबानचा उपनेता मुल्ला अब्दुल घनी बरादर हा कोण आहे? हा कुख्यात मुल्ला उमरचा सख्खा मेहुणा आहे. त्याला अमेरिकेनेच एकेकाळी मुसक्या आवळून पाकिस्तानात कैदेत टाकले होते. स्वतःच्या सैन्याची माघार सुकर व्हावी म्हणून बोलणी करण्यासाठी अमेरिकेनेच त्याला नंतर तुरुंगातून बाहेरही काढले. अमेरिकेच्या ह्या स्वार्थी आणि आपमतलबी राजकारणाने अवघ्या जगाला आज नव्या संकटाच्या खाईत ढकलले आहे.
आज सत्ता हाती येऊन सारे स्थिरस्थावर होईपर्यंत आणि जागतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत आपले खरे दात दाखवण्याएवढे तालिबानी नेतृत्व मूर्ख नाही. सध्या त्यांना देशात यादवी नको आहे म्हणूनच सार्वत्रिक माफीद्वारे सरकारी कामकाज पूर्ववत सुरू करण्यास त्यांनी अनुमती दिलेली आहे. आज अमेरिकेपेक्षा त्यांना चीन जवळचा वाटतो आहे आणि चीननेही त्यांच्यासाठी लाल पायघड्या अंथरलेल्या आहेत हे नवे समीकरण लक्षात घेतले पाहिजे. अफगाणिस्तानात नवा सूर्य उगवत असल्याचे दिसताच चीनच्या विदेशमंत्र्याने तालिबानी शिष्टमंडळाला पाचारण काय केले, त्यांना सहकार्याची, गुंतवणुकीची ग्वाही काय दिली. चीनलाही अर्थात तेथील आपले अब्जावधींचे आर्थिक हितसंबंध जपायचे आहेत. ९६ साली जेव्हा पहिल्यांदा तालिबानची सत्ता आली होती तेव्हा ह्याच चीनने त्यांना मान्यता देणे नाकारून तेथील दूतावास बंद करून राजनैतिक संबंध संपवले होते. आता नेमके उलटे चित्र आहे. तालिबानच्या नव्या राजवटीला पहिली मान्यता चीनची आहे आणि पूर्वीच्या तुलनेत आजचा चीन ही जागतिक महासत्ता आहे. तालिबान हे आज महासत्तांच्या हातचे खेळणे आहे. ते आपल्या हाती घेण्यासाठी आता नवा संघर्ष उफाळेल.