शाळा

0
8
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

आपले घर सोडून शाळेसाठी येथे आल्यावर लहान मुलांना तुरुंग न वाटता ते आपले दुसरे मौजेचे घर वाटायला हवे. कारण शालेय शिक्षणाची ती पायाभरणी असते व शाळेत येण्याची गोडी येथे लहान मुलांच्या मनात बिंबवायला हवी.

शाळा हे लहान मुलांसाठी चिमुकले जग असते. शाळेविषयी वेगवेगळे विचार नेहमीच मांडले जातात. आईच्या मांडीवर जेव्हा मूल बसते तेव्हा आई मुलाला संस्कारांनीच नवनवीन ज्ञान देत असते. आईची भाषा मुलाला कळते व मुलाची भाषा आईला समजते. ‘आई’ ही मुलासाठी पहिली शाळा असते. इथेच मुलाचे शिक्षण सुरू होत असते.
शाळा बिनभिंतीची असावी का? अगोदरच्या काळी संयुक्त कुटुंब ही एक शाळाच होती. मुलाच्या संपर्कात येणारी सगळी माणसे मुलाचे लाड करतच ज्ञान देत होती. गुरांना बोलावणे, पक्ष्यांना दाखवणे, कुत्र्या-मांजराशी खेळवणे, वेगवेगळ्या वाहनांच्या आवाजाशी बागडणे यांमधून मुलांचे मनोरंजन होत असे आणि त्याचबरोबर मुलाचे निरीक्षण सतत चालू असे. संवेदनशील मनामुळे व चौकस वृत्तीने मुलाला प्रत्येक वस्तूचे आकलन होत असे. तो संयुक्त कुटुंबाचा जमाना गेला व विभक्त कुटुंबाचा नवीन जमाना आला.

आज मुलाला शाळा हवी या कायद्यामुळे मुलाच्या जन्मतारखेचे प्रमाणपत्र घेऊन शाळेत नावनोंदणीसाठी आई-बापाची धावपळ सुरू होते. कित्येक सरकारी बालवाड्यांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. सोबतीला अंगवाड्यांची सोय असते. येथे मुलांना खेळण्यांबरोबर खेळवणे, खायला-प्यायला देणे आणि करमणुकीची वेगवेगळी साधने वापरणे यावर विशेष लक्ष दिले जाते. येथे मुलांना कठीण काही न वाटता तेथे येण्यातच आनंद प्राप्त व्हायला हवा. अभ्यासक्रम शिकण्यापेक्षा मुलांच्या आंतरिक वृत्ती प्रफुल्लित करण्याकडे भर द्यायला हवा. अक्षर-ओळख व आकडे-ओळख खेळण्यातून, रंगीत चित्रांतून, मोठ्या चार्टमधून व्हायला हवी. येथे लिहिण्याची सक्ती मुलांवर करू नये. पाहून, आकलन होऊन तोंडाने म्हणणे एवढे जरी जमले तरी खूप झाले. मुलांच्या बुद्धीला जरादेखील ताण येथे देऊ नये. तणावविरहित ज्ञानदान हे नवीन सूत्र स्वीकारावे.

आज नर्सरी, केजी, प्रि-प्रायमरी शाळा खूप पैसे घेऊन खाजगी संस्थांमधून चालतात. त्यांची लहान मुलांसाठी साधने खूप असतात. नव्या पद्धतीदेखील अमलात आणल्या जातात. तशा प्रकारचे खास ट्रेनिंग व प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षिका तेथे नियुक्त केलेल्या असतात. शाळेचे आवारदेखील खूप मोठे असते, जेथे मुलांसाठी सगळ्या प्रकारच्या खेळांसाठी सुविधा प्राप्त करून दिलेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ऐसपैस लांब-रुंद मोकळी जागा असते.

आपले घर सोडून शाळेसाठी येथे आल्यावर लहान मुलांना तुरुंग न वाटता ते आपले दुसरे मौजेचे घर वाटायला हवे. ही जागरूकता शाळेच्या व्यवस्थापनाने लक्षात ठेवायला हवी. कारण शालेय शिक्षणाची ती पायाभरणी असते व शाळेत येण्याची गोडी येथे लहान मुलांच्या रक्तात बिंबवायला हवी. शिकणे म्हणजे आनंदी-आनंद वाटायला हवा.

अगोदरच्या नियमांप्रमाणे प्राथमिक शाळेत प्रवेश करताना वयाची पहिली पाच वर्षे ओलांडलेली असायची. निरीक्षण-शक्ती, चौकस-शक्ती, आकलन-शक्ती, अभिव्यक्ती-शक्ती ही सगळी ताकद मुलांच्या शरीरात बहरत चाललेली असायची. 2020 ची नवीन राष्ट्रीय शिक्षण पॉलिसी पहिल्या इयत्तेत प्रवेश करायला सहा वर्षे पूर्ण करायला सांगते. हा नवीन दृष्टिकोन आपण स्वीकारावा. आपल्या बालपणामध्ये प्राथमिक शाळा म्हणजे एक चार भिंतींचे खोके असायचे. करड्या शिस्तीचा एक मास्तर असायचा. छम्‌‍ छम्‌‍ छडी वाजवणे हा त्याचा अधिकार असायचा. थोडे मायाळू मास्तर होते हेही तेवढेच खरे आहे. त्यामानाने बाईचे हळुवार प्रेमळ बोलणे लहान मुलांना आवडायचे. एकूण व्यक्तिमत्त्व मायाळू वाटायचे. आईचा जेवढा लळा असतो तेवढाच लळा या हसत-नाचत शिकवणाऱ्या बाईचा लहान मुलांना लागायचा.

प्राचीन काळामध्ये शाळेच्या साधन-सुविधांकडे लक्ष दिले जायचे नाही ही तक्रार आवर्जून पुढे येते. हात-पाय धुवायला नळाचे पाणी नव्हते, लघवीला अथवा शौचास जायला संडासाची सोय नव्हती, वर्गात विजेचे दिवे नव्हते, फॅन नव्हते, बसायला बाक नव्हते, पुस्तके ठेवायला अथवा लिहायला डेस्क नव्हते, शिक्षकाला मुलांसाठी गृहपाठ लिहून द्यायला फळा नव्हता, छप्पर फुटके असल्यामुळे पावसाळ्यात पाणी आत गळायचे, वाऱ्याच्या झोताबरोबर पावसाच्या पाण्याचा बाहेरून मारा आत व्हायचा. पावसाळ्यात आकाशात काळे-काळे ढग दाटून आल्यावर सगळा अंधार शाळेत पडायचा. कोंबडीची पिल्ले जशी पावसात अंग चोरून आडोशाला उभी राहतात, तशी हात-पाय पांघरून लहान मुले टुकूर टुकूर बघत कुडकुडत बसायची. याच वातावरणातून कवीला कविता सुचली असेल-
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…
येवढे सगळे त्रास सोडून मुले नियमितपणे धावत-पळत, हुल्लडबाजी करत, नाचत-ओरडत शाळेत यायची हीच सगळ्या शिक्षणशास्त्रातील जमेची बाजू होती. याच शाळांमध्ये शिकून, पुढे मोठमोठ्या पदव्या घेऊन या भूमीत महान विद्वान निर्माण झाले. या शाळांचाच त्यांना आशीर्वाद मिळाला असे म्हटले तर गैर होणार नाही.
आजच्या शाळा बदलल्या आहेत. सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये सगळ्या आधुनिक सुविधा व सुखसोयी आहेत. शिक्षणाचा बाजार कोणीच करू नये. शाळा ही नेहमीच पवित्र असावी. जी भाषा लहान मुलांना कळते, समजते, आकलन होते, अभिव्यक्त होते, त्याच भाषेत त्यांच्याशी अखंडपणे संवाद साधावा. श्रीमंत मुलांना जशी श्रीमंत शाळा मिळते, तशीच गरीब मुलांना निदान गरीब शाळा तरी मिळायला हवी. काहीच नसण्यापेक्षा थोडे तरी असणे हे नेहमीच सर्वश्रेष्ठ असते.