शांघाय शिखर परिषदेत (एससीओ) सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले असून समरकंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला अरिपोव्ह आणि इतर अधिकार्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. एससीओच्या राज्य प्रमुखांच्या परिषदेची बैठक समरकंद येथे होणार आहे.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे नेते इब्राहिम रायसी यांच्यासह इतर नेत्यांसह एससीओच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्जियोयेव यांचा निमंत्रण स्वीकारून तिथे दौर्यावर जात आहेत.
एससीओचे शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत त्यांची भेट निश्चित झालेली नाही. शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी १० नंतर एससीओचे सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसापूर्वी दिल्लीला परतणार आहेत.