शहिदांच्या वंशजांच्या उपस्थितीने दाटला गहिवर

0
111

आज बांबोळीत क्रांतीदिन कृतज्ञता सोहळा
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि भारतीय स्वातंत्र्यसमराच्या धगधगत्या इतिहासात अजरामर झालेल्या अशा अनेक शहीदांच्या वंशजांनी काल पणजीत एका अनौपचारिक कार्यक्रमात आपल्या आजोबा, पणजोबांच्या त्या तेजस्वी क्रांतिकार्याच्या स्मृती जागवल्या, तेव्हा उपस्थितांची मनेही हेलावून गेली.
लोकमान्य को ऑपरेटीव्ह मल्टीपर्पज सोसायटीने पुण्याच्या टिळक विचार मंचच्या सहकार्याने आज बांबोळीच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये ‘गर्जा जयजयकार’ या अनोख्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, त्याच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून गोव्यात आलेल्या अनेक शहीदांच्या वंशजांची ओळख निवडक मान्यवरांना घडवली गेली, तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यसमरात ज्यांनी सर्वस्वाचा होम केला, त्यांच्या वंशजांच्या तोंडून त्या समरगाथा ऐकताना उपस्थितांची मने हेलावून गेली आणि अनेकांच्या मनात गहिवर दाटला. आजच्या स्वतंत्र भारतात या शहीदांच्या वंशजांची उपेक्षा का, हाच प्रश्न ज्याच्या त्याच्या मनात उभा राहिला.
शहीदांच्या वंशजांच्या या मांदियाळीत कोण नव्हते! आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, काकोरी हत्याकांडात शहीद झालेले अशफाकउल्ला खान, अत्याचारी सँडहर्स्टला यमसदनी पाठवणारे शिवराम हरी राजगुरू, जुलमी जॅकसनला कंठस्नान घालणारे अनंत कान्हेरे, दामोदरपंत चाफेकर, देशासाठी हसत हसत फासावर गेलेले भगतसिंग, सौराष्ट्रातील क्रांतीकारक सरदारसिंग राणा, १८५७ चे क्रांतीकारक मंगल पांडे, शचिंद्रनाथ बक्षी, शेवटचा देशभक्त सम्राट बहादूरशाह जफर, लाहोर खटल्याअंती फाशी गेलेले विष्णू गणेश पिंगळे, रामगढची वीरांगना राणी अवंतीबाई अशा अनेक शहीदांच्या तिसर्‍या ते पाचव्या पिढीतील वारस एकत्र पाहण्याचे देवदुर्लभ भाग्य उपस्थितांना लाभले आणि आज राज्यातील दहा हजार विद्यार्थ्यांनाही ते लाभणार आहे.
लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश व दीपक टिळक यांच्या प्रयत्नांतून आणि ‘लोकमान्य’ चे सर्वेसर्वा व दै. तरूण भारतचे संपादक श्री. किरण ठाकूर यांच्या परिश्रमांतून या सर्व थोर शहीदांच्या वंशजांना गोव्यामध्ये एका मंचावर आणण्यात आले आहे.
काकोरी खजिना लूटप्रकरणी रामप्रसाद बिस्मिल यांच्यासमवेत फासावर १९ डिसेंबर १९२७ रोजी फासावर गेलेले भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले मुसलमान हुतात्मा असलेल्या अश्फाकउल्ला खान यांच्या त्यांचेच नाव लाभलेल्या अश्फाक या पणतूने आपल्या पणजोबांची एक ह्रदयस्पर्शी आठवण सांगितली. फासावर देताना त्यांना त्यांची शेवटची इच्छा काय असे विचारले गेले, तेव्हा त्यांनी ‘‘कुछ आरजू नही, है आरजू तो यह है, रख दे कोई जरासी खाक ए वतन कफन मे’’ ही आपली शायरी सुनावली होती, असे अश्फाक यांनी सांगितले.