ईजिप्तचे शर्म अल शेख पुन्हा एकदा शरमिंदे झाले. ज्या तऱ्हेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भर व्यासपीठावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चाटूगिरी चालवली, ज्या तऱ्हेने त्यांचे जवळजवळ बूटपॉलिश केले, ते पाहिले तर आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंध आज कोणत्या थराला येऊन पोहोचले आहेत हे लक्षात येते. ट्रम्प यांना शर्म अल शेखच्या गाझा शांतीपरिषदेच्या मंचावर गाझावासीयांची वेदना दूर सारण्यापेक्षा स्वतःचाच अधिक उदोउदो करून घ्यायचा होता हेच ह्या परिषदेतून दिसून आले. आपले भाषण सुरू असताना मध्येच त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची ‘माझा आवडता फिल्ड मार्शल’ म्हणून आठवण काय काढली, असीम मुनीर उपस्थित नसल्याने नाईलाजास्तव बोलावल्यागत पाकिस्तानच्या पंतप्रधानांस मध्येच भाषणास काय बोलावले आणि ती संधी साधून शाहबाज शरीफ यांनी ज्या प्रकारे ट्रम्प यांची बूटचाटूगिरी केली ती खरोखर जगाला थक्क करून गेली आहे. मुळात पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या समोर त्यांच्या लष्करप्रमुखाची आठवण जाहीरपणे काढून आणि त्याच्या अनुपस्थितीची दखल घेऊन नंतर नाईलाज झाल्यागत पाकिस्तानच्या पंतप्रधानाची दखल घेणे हे राजशिष्टाचाराच्या विपरीत आणि अत्यंत अवमानकारक आहे. परंतु शाहबाज शरीफ यांना त्याची शरमही दिसली नाही. शाहबाज शरीफ यांनी तीच संधी साधून आपल्या भाषणातून ट्रम्प यांचे गोडवे गाऊन पाकिस्तानच्या सध्याच्या लाळघोट्या वृत्तीचे यथास्थित दर्शन जगाला घडले आहे. शरीफ यांनी ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने तर उधळलीच, शिवाय नोबेल शांती पुरस्कारासाठी दुसऱ्यांदा त्यांचे नामांकनही जाहीर करून टाकले. व्यासपीठावर दोन हातांच्या अंतरावर उभ्या असलेल्या इटलीच्या प्रमुख जॉर्जिया मेलोनी ह्या तर हा सगळा प्रकार पाहून किती थक्क झाल्या हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. परंतु ट्रम्प यांना स्वतःचा उदोउदोच करून घ्यायचा होता. त्यामुळे उपस्थितांकडून पुन्हा पुन्हा उभे राहून त्यांना दिली जाणारी मानवंदना आणि स्तुतीसुमनांचा वर्षाव यातच ट्रम्प खूष दिसत होते. नाही म्हणायला आपल्या भाषणात त्यांनी भारताचीही आठवण काढली. ‘इंडिया इज अ ग्रेट कंट्री, अ व्हेरी गूड फ्रेंड’ असे मोघमरीत्या ते जरूर म्हणाले, आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांस व्यासपीठावरच तुम्ही चांगल्या रीतीने एकत्र नांदणार ना, असेही विचारायला कमी केले नाही. गाझा शांती परिषदेच्या मंचावरून हे जे काही चालले होते, ते अत्यंत हास्यास्पद स्वरूपाचे होते आणि ह्यातले सगळ्यांत विनोदी पात्र होते ते स्वतः डोनाल्ड ट्रम्प. जणू सगळे जग आपल्या कह्यात असल्यागत त्यांचा एकूण थाट होता. खरे म्हणजे गाझासंदर्भात इस्रायल आणि हमास यांच्यात तूर्त युद्धविराम घडवून आणण्यात त्यांना यश आलेले असले, तरी हा समेट किती काळ टिकेल ह्याबाबत अद्यापही संपूर्ण अनिश्चितता आहे. ना इस्रायलने ह्या समझोत्याच्या दुसऱ्या टप्प्यास अद्याप आपली मान्यता दिलेली आहे, ना हमासने. त्यामुळे अजूनही सगळे काही कागदावर आणि अर्धकच्च्या स्वरूपात असतानाही ट्रम्प यांनी शर्म अल शेखमध्ये हा जो काही तमाशा मांडला, त्यामागे केवळ स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा अत्यंत हास्यास्पद प्रयत्नच होता. भारताचे पंतप्रधान ह्या शांती परिषदेला का गेले नाहीत, भारताने मोठी संधी गमावली वगैरे मुद्दे शशी थरूर मांडताना दिसतात, परंतु मोदी गेले नाहीत हेच अगदी योग्य झाले असे तेथे जे घडले ते चित्र पाहता वाटते. अन्यथा, मोदी आणि शरीफ यांना व्यासपीठावर हस्तांदोलन करण्यास सांगून मोदींना संकटात टाकायलाही ट्रम्प यांनी कमी केले नसते. भारताने आपले प्रतिनिधी ह्या शांती परिषदेला जरूर पाठवले, परंतु परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धनसिंग यांना पाठवण्याचा सुज्ञपणा भारताने दाखवला. ह्यापूर्वी कॅनडातून परतणाऱ्या पंतप्रधान मोदींस ट्रम्प यांनी भेटीला बोलवून त्याच दिवशी असीम मुनीरला जेवायला बोलावले होते. त्या दोघांना समोरासमोर आणण्याचाही ट्रम्प यांचा तेव्हा इरादा दिसत होता, परंतु तेव्हा आपल्या नियोजित दौऱ्याचे कारण दाखवून मोदींनी ते संकट टाळले होते. आताही सध्या भारतभेटीवर आलेल्या मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीचे कारण देत पंतप्रधानांनी शर्म अल शेखला जाणे टाळले आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर देखील गेले नाहीत. त्यामुळे भारताने ह्या सगळ्या तमाशापासून दूर राहून, परंतु गाझामधील शांतीवार्तेसंदर्भात आपला दूरस्थ पाठिंबा दर्शवून स्वतःची इभ्रत राखली असेच म्हणायला हवे. पाकिस्तानने मात्र ट्रम्प यांच्याशी जवळीक साधण्याची आणखी एक संधी साधली, जी भविष्यात भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. शर्म अल शेख पश्चिम आशियासाठी एक नवी सुरूवात ठरू शकेल असे चित्र निर्माण केले गेले होते, प्रत्यक्षात दिसला तो ट्रम्प यांचा तमाशा!