मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आठ मंत्र्याच्या २८ मार्चला झालेल्या भव्य आणि दिमाखदार शपथविधी सोहळ्यावर तब्बल ५ कोटी ५९ लाख रुपये खर्च केल्याचा प्रकार माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळवलेल्या माहितीतून समोर आला आहे.
रायबंदर येथील वकील ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांना सर्वसाधारण प्रशासन विभागाने आरटीआयखाली दिलेल्या माहितीमध्ये शपथविधी सोहळ्याच्या खर्चाचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झाला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
मुख्य व्यासपीठ डेकोरेशनवर सुमारे १ कोटी ८७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. व्यासपीठाच्या पार्श्वभूमीला विधानसभा संकुलाचा देखावा तयार करण्यात आला होता. ५०० विशेष व्हीआयपी खुर्च्यांवर ३ लाख, ३५०० इतर व्हीआयपी खुर्च्यांवर ८ लाख ७५ हजार रुपये, दहा हजार लोकांसाठी जेवणावर ५७ लाख ५० हजार रुपये, व्हीआयपींच्या जेवणासाठी ४ लाख ८० हजार, ७५ अतिमहनीय व्यक्तींच्या खास जेवणासाठी ५ लाख ६६ हजार रुपये, दोन कमानींवर १६ लाख रुपये, ध्वनिक्षेपक यंत्रणेवर १४ लाख रुपये, तीन रेड कार्पेटवर ८ लाख २५ हजार रुपये, स्टेडियमबाहेर लोकांसाठी मंडपावर १९ लाख रुपये, २४०० कट आऊटवर ६८ लाख ४० हजार रुपये आदी खर्चाचा समावेश आहे.