शत्रूचा ताकदीने मुकाबला करू : पर्रीकर

0
117
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल नवी दिल्लीत साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात ताबा स्वीकारल्यानंतर हवाई दल प्रमुख एअर मार्शल अरुप राहा, नौदल प्रमुख ऍडमीरल आर. के. धोवन, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांच्याशी बातचित केली. यावेळी संरक्षण राज्य मंत्री राव इंद्रजीत सिंग, संरक्षण सचिव आर. के. माथुर, संरक्षण उत्पादन सचिव जी. मोहन कुमार, माजी सैनिक कल्याण सचिव प्रभुदयाल मीना यांचीही उपस्थिती होती.

उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी सादर
शेजारील राष्ट्रांशी संबंध हा संवेदनशील मुद्दा आहे, मात्र शत्रूंसमोर भारत कधीही हतबल वा संरक्षणविहीन नसेल, शत्रूचा ताकदीने मुकाबला करू, असे नव्यानेच केंद्रीय संरक्षण मंत्रीपदाचा ताबा स्वीकारलेले मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.मला केंद्राचा अनुभव नाही, किमान आठवडाभराचा अवधी खात्याचा व संबंधित विषयांच्या अभ्यासासाठी द्या, त्यानंतर सर्व प्रश्‍नांना उत्तरे देतो, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. लखनऊ येथे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर ते बोलत होते.
माझे काम संरक्षण फौजांच्या माध्यमातून देशाचे बळकटीकरण करणे हे आहे.
उत्तर प्रदेशातून राज्य सभेवर जायला मिळत आहे, त्याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. या राज्यांनी देशाला मोठे नेते दिले. शिवाय ही राम-कृष्णाची भूमी आहे, म्हणजे देशाच्या इतिहासाचा सुरुवातीचा बिंदू, अशा राज्यातून प्रतिनिधित्व करायला मिळते आहे, यासाठी नशीबवान समजतो. देशाच्या सेवेसाठी माझी पूर्ण क्षमता पणाला लावीन असे सांगताना, उत्तर प्रदेशसाठीही समर्पित राहीन, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
संरक्षण सौदे गतीमान, पारदर्शक
संरक्षण सौदे गतीमान व पारदर्शक बनवले जातील, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल खात्याचा ताबा स्वीकारल्यानंतर सांगितले. गती आणि पारदर्शकता ही आपल्या कामाची एक पद्धत असल्याचेही त्यांनी पत्रकारांकडे नमूद केले.
आपल्या साऊथ ब्लॉक कार्यालयात ताबा स्वीकारल्यानंतर त्यांनी संरक्षण सचिव आर. के. माथूर व तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांशी बातचित केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘भारत घडवा’ संकल्पनेविषयी नमूद करताना यापुढे जास्तीत जास्त संरक्षणविषयक उत्पादने भारतातच घडविण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केेले. जेवढे होईल तेवढे देशातच उत्पादन झाले पाहिजे. त्याने रोजगार संधीही वाढतात. संरक्षण विषयक उत्पादन देशात घडवताना सरकारच्या कौशल्य विकास खात्याची मदत घेणार असल्याचे पर्रीकर म्हणाले.
संरक्षण मंत्रालयासफोरील आव्हाने
कालबाह्य शस्त्रे बदलणे.
नवी शस्त्रात्रे संपादित करणे.
भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूफीवर विशेष काळजी घेणे.