फकिरांनी शत यज्ञ मांडिले,
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये
आरुण मंगल लाट..
शतकानंतर आज पाहिली
पहिली रम्य पहाट…
- कविवर्य वसंत बापट
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आज आपण सारे घरोघरी तिरंगा फडकावून जल्लोषात साजरा करीत आहोत. गेल्या पंच्याहत्तर वर्षांतील देशाच्या वाटचालीकडे अभिमानाने मागे वळून पाहतो आहोत. पुढील पंचवीस वर्षांत येणार असलेल्या शतकमहोत्सवातील भारत कसा असेल त्याची उज्ज्वल स्वप्ने रंगवितो आहोत. निश्चितच हा मागे वळून पाहण्याचा आणि भविष्याचा वेध घेण्याचा मंगल दिवस आहे. आपले लाडके दैनिक नवप्रभाही आज आपला ५२ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. हा दुग्धशर्करायोग साधून आज आम्ही आपल्यापुढे अमृतकाल हा विशेषांक घेऊन आलो आहोत. विविध क्षेत्रांतील अभ्यासकांनी केलेले हे सिंहावलोकन आपल्याला निश्चित माहितीप्रद वाटेल असा विश्वास आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आज त्या सार्या ज्ञात – अज्ञात वीरांचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते, ज्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्याची ही गोमटी फळे आपल्याला चाखता आली. ज्यांनी स्वातंत्र्याच्या ध्यासापायी आपल्या घरादाराची राखरांगोळी केली, संसारावर तुळशीपत्र ठेवून जे जुलमी परकीय सत्तेशी निर्धाराने लढले, कारावासांत सडले, प्रसंगी फासावर चढले, त्या सर्वांच्या स्मरणाने आज आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याच पाहिजेत. भारतीय असंतोषाचे जनक ठरलेले लोकमान्य टिळक, शांती आणि अहिंसेचे पूजक असूनही ब्रिटीश राजसत्तेला गदगदा हलवून सोडणारे महात्मा गांधी, आझाद हिंद फौज उभारून थेट लष्करी आव्हान उभे करीत ब्रिटीश साम्राज्याला ललकारणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, काळ्या पाण्यातील प्रदीर्घ कारावास सोसतानाही जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे असे स्वातंत्र्यदेवतेचे महन्मंगल स्तोत्र गाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, तारुण्याचा होम करून हसत हसत फासावर गेलेले शहीद भगतसिंह आणि असे अनेक तरुण देशभक्त, स्वातंत्र्यानंतर या देशाच्या नवनिर्माणाचा मजबूत पाया उभारणारे पंडित नेहरू, या देशाचे सक्षम संविधान आखून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या गेल्या ७५ वर्षांच्या वाटचालीत आपापल्या परीने राष्ट्रउभारणीस कमी अधिक हातभार लावणारे तमाम नेते, मुत्सद्दी, संंशोधक, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत या सगळ्या प्रयत्नांतून आपल्याभोवतीचे वर्तमान साकारले आहे याची कृतज्ञ जाणीव आज हवीच. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आपल्या गोव्याला चौदा वर्षे उशिरा स्वातंत्र्य मिळाले हा सलही निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मनात आहे. गोमंतक हा भारताता अविभाज्य भाग आहे हे ठणकावून सांगणारे आणि येथे क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविणारे डॉ. राममनोहर लोहिया आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लढलेल्या आपल्या झुंजार स्वातंत्र्यसैनिकांना आणि देशाच्या कानाकोपर्यातून गोवा मुक्तीचा एकच ध्यास घेऊन आलेल्या, जुलूम सोसलेल्या, गोळ्या झेललेल्या तमाम सत्याग्रहींनाही आज विसरून कसे बरे चालेल?
गेल्या पंच्याहत्तर वर्षांच्या या देशाच्या वाटचालीचा विचार केला तर आपण सर्वांत महत्त्वाची कोणती गोष्ट साध्य केली असेल तर ती म्हणजे येथे नांदणारी सुदृढ लोकशाही! आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेल्या इतर देशांमध्ये लोकशाहीच्या कशा चिंधड्या उडाल्या हे आपण पाहतोच आहोत. परंतु आपण खर्या अर्थाने आज स्वतंत्र आहोत. आचार – विचार – उच्चाराचे हे जे संवैधानिक स्वातंत्र्य आपल्याला लाभले आहे, ते चिरंतन जपण्याचा संकल्प करण्याचा आजचा क्षण आहे. या देशातील लोकशाही कधीही हुकूमशाहीत रूपांतरित होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे. या देशाचा जो निधर्मी, सर्वसमावेशक, उदात्त चेहरा आहे तो पुसला जाणार नाही, या विशाल देशाच्या भौगोलिक विविधतेतही दिसणार्या दृढ एकात्मतेला बाधा आणली जाणार नाही हे पाहण्याची जबाबदारीही एक सजग नागरिक म्हणून आपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ कार्यकाळात देशवासीयांच्या आशाआकांक्षांना नवे पंख फुटले आहेत. या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वतोपरी कटिबद्ध होण्याचा संकल्प आज करूया. जय हिंद! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!