देशभरात नागरिक सुट्ट्या पैशांसाठी मेटाकुटीस आल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने शंभर रुपयांच्या नव्या नोटा काढण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नोटांबरोबर शंभराच्या जुन्या नोटाही चलनात राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीस महिना पूर्ण होत असतानाही व्यवहारात दोन हजार रुपयांच्या नोटा वापरणे कठीण जात आहे. पाचशे, हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर शंभराच्या नोटांचीही टंचाई निर्माण झाल्याने नागरिक जेरीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर आरबीआयने शंभराच्या नव्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटांच्या पॅनेलमध्ये इनसेट लेटर नसेल. याआधी रिझर्व्ह बँकेने ५० व २० रुपयांच्या नव्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. रोख रक्कमेच्या अभावी बाजारपेठांमध्ये छोट्या व्यापार्यांना मोठे नुकसान सोसावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र या तिन्ही प्रकारच्या नोटा चलनात आल्यानंतर लोकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, नोटाबंदीमुळे सर्वाधिक फटका सेवा क्षेत्राला बसला असल्याचा दावा एका संशोधन संस्थेने केला आहे. देशात सेवा क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा ६० टक्के एवढा आहे.