‘शंखश्रीं’चं सहस्त्रचंद्रदर्शन

0
51
  • प्रा. रमेश पुरुषोत्तम सप्रे

शिवराय या आराध्य दैवतासारखेच आ. विजयराव देशमुख हे ‘श्रीमान योगी’. त्यांची श्रीमंती अर्थातच सर्जनशील विचारांची नि उन्मेषशालिनी प्रतिभेची. पण या सर्वांचा कळसबिंदू ठरतो तो त्यांच्या जीवनाचा गेल्या चार तपांचा कालखंड. एक देवदुर्लभ, अमृतमधुर योग म्हणजे प. पू. विष्णुदास महाराजांनी आपल्या विजयरावांना दिलेला अनुग्रह.

प्रसंग आहे ‘सूर्यपुत्र’ या महाभारतातील कर्णाचं चरित्र नि चारित्र्य यांचं चित्रण करणार्‍या पुस्तकाची प्रत आ. विनोबा भावे यांना अर्पण करण्याचा, तसा साधाच पण विनोबांच्या मार्मिक भाष्याची झालर असलेला.

विनोबा उवाच – मी जर राष्ट्रपती असतो तर तुम्हाला या लेखनाबद्दल पद्मश्री दिली असती. पण आता ‘शंखश्री’ देतो. महाभारत युद्धात रोज प्रारंभी दोन्ही सैन्यातील सेनापती शंख फुंकत. पण सूर्यास्ताला जेव्हा युद्ध थांबे त्यावेळी त्या दिवसाच्या विजयी पक्षाच्या सेनापतीला शंख फुंकण्याचा सन्मान मिळे. त्याला ‘शंखश्री’ म्हणत.’
विनोबांनी अर्थातच ‘सूर्यपुत्र’ ग्रंथाचे लेखक श्री. विजयराव देशमुख यांना आशीर्वादांसह ही ‘विजयश्री’ दर्शवणारी पदवी दिली- शंखश्री! असो.

आ. विजयराव देशमुख हे विदर्भातील प्रख्यात शिवचरित्रकार आणि व्याख्याते. विजयरावांना विदर्भातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणायचं की बाबासाहेबांना महाराष्ट्राचे विजयराव देशमुख म्हणायचं याचा निर्णय या दोन्ही महनीय व्यक्तींनीच दिलाय. शिवशाहिरांचं शिवरायांवरचं जिवंत महानाट्य ‘जाणता राजा’ हे महाप्रयत्नांनी वैदर्भीय रसिक प्रेक्षकांना दाखवलं. तसंच ‘शककर्ते शिवराय’ या महाग्रंथाचे संशोधक लेखक विजयरावांचा – ‘शिवचरित्रकार विजयराव देशमुखांच्या ‘शककर्ते शिवराय’ या शिवचरित्राचं स्थान निर्विवाद अव्वल आहे. ते ऐतिहासिक साधनांचा अभ्यास मांडणारे प्रथमस्थानीचे शिवचरित्रकार आहेत’- असा गौरव केला आहे.
वक्तृत्व – कर्तृत्व – नेतृत्व असा रम्य त्रिवेणीसंगम आ. विजयरावांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. अवघ्या १९ व्या वर्षी शिवकार्याला त्यांनी प्रारंभ केला. अनेक जन्मांचे शिवराय – त्यांची माता जिजाबाई नि पुत्र संभाजीराजे या शिवपरिवाराशी ऋणानुबंध असल्यासारखं शिवकार्य त्यांच्याकडून घडलंय. दृष्टिक्षेप टाकायचा झाला तर –

  • दहा हजारांहून अधिक शिवचरित्रावर आधारित संपूर्ण देशभर व्याख्यानं
  • सहा लाखांहून अधिक शिवभक्तांवर या प्रत्ययकारी व्याख्यानातून शिवसंस्कार
  • पाच हजार शिवभक्तांना सतत अठरा वर्षं शिवदुर्ग दर्शन यात्रा
  • दोन भव्य नेत्रदीपक सोहळ्यांचं प्रभावी आयोजन –
  • जिजामाता जन्मोत्सव सोहळा – १९८२ साली. उपस्थिती सव्वा लाख शिवभक्त.
  • छ. संभाजी महाराजांचा तीनशेवा बलिदान दिवस – वडू कोरेगाव येथे – उपस्थिती दीड लाख शिवभक्त.
  • सर्वांत महत्त्वाचं योगदान म्हणजे – शिवरायांशी संबंधित अशा व्यक्तींवर नि विषयांवर आ. विजयरावांनी केलेलं विपुल लेखन. उदा. शककर्ते शिवराय या बृहद्ग्रंथ मराठी व हिंदी भाषांत; राजा शंभू छत्रपती, क्षत्रिय कुलावतंस, महाराजांच्या मुलखात, सिंदखेडराजा; सिंहासनाधीश्‍वर, इ.
    विशेष म्हणजे या ग्रंथांच्या हजारोंनी प्रती घराघरांत पोहोचल्या आहेत.
  • यावर कळस म्हणजे गेल्या चाळीस वर्षांपासून दरवर्षी भारतातील महनीय व्यक्तींना दिल्या जाणार्‍या ‘जिजामाता विद्वत् गौरव’ पुरस्काराची स्थापना.

तसे लेखक, व्याख्याते अनेक असतात. त्यात संशोधक, अभ्यासक, चिकित्सक असेही असतात. पण आ. विजयराव यात एखाद्या तेजस्वी नक्षत्रासारखे उजळून (केवळ खुलून नव्हे!) दिसतात. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला असलेले विविध पैलू. जसे –

  • प्रेरक वाणी आणि शैलीदार लेखणी यांचा प्रसन्न योग.
  • प्रभावी वक्तृत्व आणि कुशल कर्तृत्व यांचा प्रेरक संगम.
  • संस्कारित उच्चाराला, सुसंस्कृत विचार नि व्रतस्थ आचाराची जोड
  • निष्काम कर्मयोग आणि संघटनकौशल्य यांचा दुर्मिळ योग.
    असे बहुआयामी चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व आजच्या डिजिटल- व्हर्च्युअल जमान्यात केवळ अपूर्व!
    शिवराय या आराध्य दैवतासारखेच आ. विजयराव हे ‘श्रीमान योगी’. त्यांची श्रीमंती अर्थातच सर्जनशील विचारांची नि उन्मेषशालिनी प्रतिभेची.
    याहून महन्मंगल अध्याय म्हणजे आ. विजयरावांच्या जीवनगंगेला लाभलेलं आध्यात्मिक वळण. त्यांच्या जीवनसरितेला लाभलेल्या विविध वळणांचा उल्लेख ‘शिवगंगौघ’ या त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या गौरव ग्रंथाच्या संपादकीयात अतिशय मार्मिक शब्दात केला गेलाय-
    ‘गंगेचा प्रवाह ज्या ज्या वेळी बदलतो त्या त्या वेळी तिला वेगवेगळी नावे प्राप्त होतात- अलकनंदा, भागीरथी, पद्मा… त्याचप्रमाणे विजू ते विजयराव, विजयराव ते शिवकथाकार, शिवकथाकार ते शिवचरित्रकार आणि शिवचरित्रकार ते प.पू. सद्गुरुदास महाराज.’
    खरं तर यात आ. विजयरावांचा लौकिक चरित्रप्रवाह छान दिसून येतो. नव्हे अनुभवायला मिळतो.

पण या सर्वांचा कळसबिंदू ठरतो तो त्यांच्या जीवनाचा गेल्या चार तपांचा कालखंड. एक देवदुर्लभ, अमृतमधुर योग म्हणजे प. पू. विष्णुदास महाराजांनी आपल्या विजयरावांना दिलेला अनुग्रह. वर्षं होतं १९८४! सद्गुरुकृपेच्या छायेत सहा वर्षं सघन सांद्र आध्यात्मिक अनुभव घेतल्यावर आ. विजयरावांवर जीवनातली सर्वांत महत्त्वाची जबाबदारी पडली. शिवभक्तांच्या परिवाराबरोबर दत्तभक्तांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाची.

सद्गुरु प. पू. विष्णुदास महाराजांच्या महासमाधीनंतर प. पू. सद्गुरुदास महाराज या सद्गुरुरूपात पुनर्जन्म झाल्यावर त्यांच्याकडून जे अनेकविध पैलू असलेले कार्य घडत आले आहे ते सर्वांना मार्गदर्शक नि प्रेरणादायी आहे. या कार्याची झलक अशी –

  • पाच हजाराहून अधिक शुद्ध अध्यात्माचं मर्म सांगणारी प्रवचनं.
  • पंचवीस हजाराहून अधिक अध्यात्मपर ग्रंथांच्या प्रती – उदा. कीर्तन-कौस्तुभ (दोन भाग), सहज बोलणे हितउपदेश (दोन भाग), प्रवचन परिमल (दोन भाग), समर्थस्मरण, हनुमान चालिसा चिंतन (मराठी, हिंदी)
  • प.पू. सद्गुरुदासांच्या प्रेरणेतून ‘मूळ गुरुचरित्रा’ची प्रत सिद्ध झाली.
  • अनेक दत्तस्थानांची विशेषतः उपासना केंद्रांची निर्मिती – सु. १३० केंद्र देशविदेशात.
  • जगभरातील दोन लाखांहून अधिक उपासकांना आध्यात्मिक मार्गदर्शन
  • महाराष्ट्र, तेलंगणा येथे पाच मंदिरांची उभारणी
  • ‘पत्रभेट’ या सद्गुरुंशी प्रत्यक्ष भेट घडावी अशा प्रकारच्या उपयुक्त साहित्यानं युक्त अशा चिंतनपर, अनुभवसमृद्ध लेखन असलेल्या मासिकाचं प्रकाशन.
    अशी अनेकविध कार्य प.पू. सद्गुरुदास महाराजांच्या माध्यमातून साकारली गेली आहेत नि जात आहेत.

नागपूरला कधीही गुरुमंदिरात गेल्यावर होणारं प.पू. सद्गुरुदास महाराजांचं आशीर्वादयुक्त प्रसन्न दर्शन हा वाळवंटातील ओयासिससारखा तन- मन शांतवणारा अनुभव असतो.
असे आपले प.पू. सद्गुरुदास महाराज ऐंशी वर्षांचे झाले. त्यानिमित्तानं त्यांना उदंड आयुष्य नि उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना श्रीगुरुदेव दत्त नि देवी शक्ती यांना करु या. त्यांनी शतायुषी होण्यात आपलाही स्वार्थ आहे, नाही का?
त्यांना अमृतमहोत्सव प्रसंगी दिल्या गेलेल्या ‘मानपत्रा’त उद्घृत केलेल्या बा. भ.(बाकीबाब) बोरकरांच्या कवितेतील पंक्तींसह पुढच्या आणखी दोन पंक्ती जोडून म्हणू या-
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती |
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके |
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाण्यासारखे ॥
प. पू. सद्गुरुदासांना मनोभावे शतवार अभिवादन!