गोवा सरकारने मोठा गाजावाजा चालवलेली ‘व्हायब्रंट गोवा’ परिषद दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या शब्दाचा केंब्रिज डिक्शनरीतला अर्थ प्रमाण मानला तर ‘व्हायब्रंट’ म्हणजे ‘ऊर्जेने पुरेपूर भरलेला’. दुर्दैवाने गोव्याची सद्यस्थिती पाहिली तर या ऊर्जेचा आज कोठे मागमूस दिसत नाही. ‘व्हायब्रंट गोवा’ ही ‘व्हायब्रंट गुजरात’ची अगदी नावापासून भ्रष्ट नक्कल आहे हे तर दिसतेच आहे. नावाजली गेलेली ‘व्हायब्रंट गुजरात’ ही नुसती परिषद नव्हती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची ती साक्ष होती. पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये प्रचंड विरोधामुळे गाशा गुंडाळावा लागलेल्या टाटांचा ‘नॅनो’ कारचा प्रकल्प मोदींनी रतन टाटांना पाठवलेल्या नुसत्या एका एसएमएसने गुजरातकडे कसा वळवला त्याचे येथे स्मरण होते. मोदींनी नुसती परिषद भरवली नाही. तत्पूर्वी तिला अनुरूप असे उद्योगाभिमुख वातावरण राज्यात निर्माण केले. प्रशासनात शिस्त आणली, विकासयोजना, साधनसुविधांना प्रचंड गती दिली आणि जातीय दंगलींनी बदनाम झालेल्या आणि चहुबाजूंनी टीकेचे लक्ष्य ठरलेल्या गुजरातला गुंतवणुकीसाठीचे आदर्श ठिकाण म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यानंतरच त्यांनी उद्योजकांना आकृष्ट करण्यासाठी ती परिषद आयोजित केली आणि जगभरातील गुंतवणुकीचा गुजरातकडे ओघ लागला. आता गुजरातचे सुकाणू मोदींच्या हाती नसले तरी देखील तेथील सरकार दरवर्षी चढत्या क्रमाने आणि वाढत्या उद्दिष्टांनिशी ती परिषद यशस्वीपणे आयोजित करीत असते. या पार्श्वभूमीवर गोव्यामध्ये आज काय स्थिती आहे? गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये एकही नवी गुंतवणूक मंजूर झालेली नाही. राज्याची भाग्यरेषा ठरू शकणारे माहिती तंत्रज्ञान प्रकल्प रखडलेले आहेत. कोणतेही नवे उद्योग गोव्याच्या वाटेवर दिसत नाहीत. साधनसुविधांचे म्हणाल तर मोपा विमानतळाचे घोडे अडले आहे. विमानतळ सोडाच, दळणवळणाचे मुख्य साधन असलेला राज्यातील एकही रस्ता आज सुस्थितीत नाही. राज्यातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला दोन दिवसांत कृती आराखडा सादर करण्यास फर्मावलेले आहे. उद्योगांना आवश्यक असलेली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वीज. राज्याच्या वीजपुरवठ्याचे देखील तीन तेरा वाजलेले आहेत. राजधानी पणजीतच रोज दिवसातून दहा वेळा वीज जाते, तेथे खेड्यापाड्यांची काय कथा? थकबाकीविरुद्ध जोरदार पावले उचलणार्या वीजमंत्र्यांना सुरळीत वीजपुरवठा मात्र देता येत नाही. राज्यात उग्र बनत चाललेली तिसरी समस्या आहे कचर्याची. साळगाववासीयांनी कचर्याचे ट्रक रोखून परत पाठवण्याची घटना तर ताजीच आहे. येणार्या काळात ही समस्या बिकट बनत जाणार आहे. जुवारी पुलाच्या परिसरात रोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, पणजीसारख्या शहरांतील पार्किंग समस्या या तर आता पाचवीलाच पुजल्यासारख्या झालेल्या आहेत. डिजिटल टॅक्सींना मीटर बसवण्याचे आश्वासन पाळले गेले नाही म्हणून काल न्यायालयाने सरकारवर न्यायालयीन बेअदबीचा ठपका ठेवला. न्यायालयाच्या दणक्यामुळे साधे शॅक्सवाटप देखील सरकारला करता आले नाही. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर राज्याच्या सर्व शहरांमधून डेंग्यूचे रुग्ण वाढत्या संख्येने आढळत आहेत. डेंग्यू, मलेरियासारखे रोग अस्वच्छतेतून फैलावत असतात. आज गोव्याच्या प्रत्येक रस्त्याकडेला प्लास्टिकयुक्त कचर्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत. साधनसुविधांपासून आरोग्यापर्यंत सर्वत्र केवळ आणि केवळ दुःस्थितीच दिसते आहे आणि ती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट बनत चालली आहे. अशा या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये ‘व्हायब्रंट गोवा’ चा कितीही गजर केला तरी जे डोळ्यांदेखत दिसते आहे ते दृष्टीआड कसे करायचे? उत्सवी सोहळे केल्याने उघड्या डोळ्यांनी दिसणारी परिस्थिती नजरेआड करता येत नसते. राज्याचे प्रशासन रुळावरून घसरत चाललेले दिसू लागले आहे. मंत्र्यांमध्येच एकवाक्यता दिसत नाही. मुख्यमंत्री एका हाती कारभार हाकत धडपडत आहेत, परंतु प्रशासनामध्ये सर्वत्र उदासीनता पसरलेली आहे. राज्याची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. केंद्र सरकारपुढे याचकाप्रमाणे हात पसरल्याविना तरणोपाय नाही. या परिस्थितीत ‘व्हायब्रंट’ आहे काय? गोव्याची प्रतिमा उजळवायची असेल, नवी गुंतवणूक येथे आकृष्ट करायची असेल तर त्यासाठी मुळात पायाभूत साधनसुविधा भक्कम हव्यात. मोदींनी ‘व्हायब्रंट गुजरात’ भरवण्याआधी नेमके ते केले होते. आपण मात्र नुसताच फुकाचा गजर करीत बसलो आहोत. गोव्यामध्ये चांगल्या साधनसुविधा असाव्यात, नवनवी पर्यावरणपूरक गुंतवणूक येथे व्हावी, गोव्यामध्ये ज्ञानकेंद्रित अर्थव्यवस्था विकसित व्हावी, येथील तरुणांच्या बुद्धिमत्तेला येथेच वाव मिळावा, गरीबी, बेरोजगारीसारख्या राक्षसांपासून या छोट्याशा भूमीची सुटका व्हावी ही प्रत्येक गोमंतकीयाची इच्छा आहे. परंतु ही सारी स्वप्ने साकारण्यासाठी परिषद नव्हे, सरकार ‘व्हायब्रंट’ बनावे लागेल!