येथील पणजी पोलिसांनी एका व्यावसायिकाची अंदाजे 4.99 लाख रुपयांना फसवणूक प्रकरणी छत्तीसगड येथील तरुण अजित भट्टाचार्य (63 वर्षे) नामक व्यक्तीला अटक केली असून त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला आहे.
यासंबंधी अभिलाष राजेंद्र वेलिंगकर (ताळगाव) यांनी तक्रार दाखल केली होती. वेलिंगकर यांना अंदाजे 13 लाख 48 हजार 876 रुपयांचे स्टील सामान पुरवठा करण्यासाठी ऑर्डर नोंद केली होती. पाच लाखांची आगाऊ रक्कम दिल्यास तीन ते चार दिवसांत सामान पुरविण्याची हमी दिली होती. सदर आगाऊ रक्कम देण्यात आली. तथापि, स्टील सामानाचा पुरवठा करण्यात आला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
पणजी पोलिसांचे एक पथक या फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी छत्तीसगडला गेले होते. स्थानिक पोलिसांच्या सहकार्यातून संशयित तरुण भट्टाचार्य याला ताब्यात घेण्यात यश मिळविले. प्राथमिक चौकशीमध्ये संशयित तरुण भट्टाचार्य याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयिताने देशातील अनेकांना सामानाचा पुरवठा करण्याचे आश्वासन देऊन गंडा घातलेला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.