व्यापार्‍याकडे सापडले १९५ कोटींचे घबाड

0
12

कानपूरमधील प्रसिद्ध अत्तर व्यापारी पियूष जैन याच्या घरावर सुमारे ६ दिवस चाललेल्या छाप्यात बेसुमार स्थावर मालमत्ता सापडली. आतापर्यंत पियूष जैनच्या घरातून १९५ कोटींची रोकड, २३ किलो सोने, २५० किलो चांदी, ६ कोटींचे चंदन तेल जप्त केले आहे. कानपूर येथील निवासस्थानी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (डीजीजीआय) २२ डिसेंबरला त्याच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्याची कारवाई २७ डिसेंबरला संपली.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आता या छाप्याची अधिकृत माहिती दिली आहे. सर्व साक्षी, पुरावे आणि आरोपांच्या आधारे पियूष जैनला २६ डिसेंबरला अटक करण्यात आल्याचे सीबीआयसीने सांगितले आहे. सीजीएसटी कायद्याच्या कलम १३२ अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आणि २७ डिसेंबरला त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. छाप्यांदरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांची करचोरी उघड करण्यासाठी कसून तपासणी केली जात आहे, असे तपास यंत्रणांनी सांगितले.