गोव्यात राजकीय भूकंपांना सुरुवात

0
38
  • प्रमोद ठाकूर

राज्यातील घसरत चाललेल्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम आता मतदारांना करावे लागणार आहे. राजकीय नेत्यांच्या माकडउड्या बंद करण्याची गरज आहे. पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात असला तरी कायद्यातील पळवाटा शोधून पक्षांतरे केली जात आहेत. त्यासाठी हा कायदा आणखीन कडक करण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे.

गोवा विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे, तशी राजकीय पातळीवरील हालचालींना गती येत आहे. राजकीय पक्षांतील नेत्यांची पक्षांतरे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. भाजपासारख्या गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या दुसर्‍या राजकीय पक्षांतील नेत्यांना आपल्या बाजूने ओढण्यास सुरुवात केली आहे. आज गोव्यातील राजकारणामध्ये तत्त्वं, निष्ठेला महत्त्व राहिलेले नाही, असे एकंदर स्थितीवरून दिसून येत आहे. राज्यात आमदारांचे राजीनामा-सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत सहा आमदारांनी राजीनामे सादर करून आपल्या सोयीनुसार दुसर्‍या पक्षात प्रवेश केलेला आहे. बाणावलीचे आमदार, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमांव यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस विधिमंडळ गटाचे तृणमूल कॉँग्रेस पक्षात विलीनीकरण केले आहे. अजूनही राज्यातील आणखी काही आमदार राजीनामे सादर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १७ आमदार निवडून आलेल्या कॉँग्रेस पक्षाचे आता केवळ दोनच आमदार राहिले आहेत.

माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे यांच्या कुटुंबात राजकारणावरून पिता-पुत्र यांच्यातील संघर्ष चर्चेचा विषय बनला आहे. गेली पाच दशके लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी आगामी निवडणूक कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून लढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यानंतर त्यांचे पुत्र तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या वडिलांनी सन्मानाने राजकारणातून निवृत्ती स्वीकारावी; अन्यथा आपणाला वडिलांच्या विरोधात उमेदवारी दाखल करावी लागेल, असा इशारा दिला आहे. त्यांच्यात राजकीय पातळीवर खरोखरच संघर्ष आहे की नाही हे आगामी काळात कळेलच. भाजपाचे विधानसभा निवडणूकप्रमुख, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ राणे यांचा आशीर्वाद भाजपाला मिळेल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर प्रतापसिंह राणेंनी आपण कॉँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे व हा पक्ष सोडण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ राणे यांनी निवडणुकीत उतरण्याचा मनोदय व्यक्त केल्यानंतर कॉँग्रेस पक्षाने तातडीने पर्ये मतदारसंघातून प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी जाहीर केली. आता आरोग्यमंत्री विश्वजित राणे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विश्वजित राणे यांना पत्नी दिव्या राणे यांना राजकारणात आणायचे आहे. वाळपई मतदारसंघातून दिव्या राणे यांना निवडणुकीत उभं करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात नव्याने दाखल झालेल्या तृणमूल कॉँग्रेस पक्षाने पक्षविस्ताराचे काम नेटाने हाती घेतले आहे. आम आदमी पक्षालासुद्धा मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे तृणमूल कॉँग्रेसमध्ये विलीनीकरण केल्याने विधानसभेत तृणमूल कॉँग्रेसला निवडणूक न लढताही एक आमदार मिळाला आहे. कॉँग्रेसचे नेते लुईझिन फालेरो यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल कॉँग्रेसने माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. त्यानंतर चर्चिल आलेमांव यांनी तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि आता सासष्टी तालुक्यातील आणखीन एक नेते, कॉँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने या पक्षाचा सासष्टी तालुक्यात विस्तार होण्यास प्रारंभ झाला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूकपूर्व मगो आणि तृणमूल कॉँग्रेस यांच्यात युती झाली आहे. त्यांच्यातील मतदारसंघांचे वाटप जाहीर करण्यात आलेले नाही. तसेच, कॉँग्रेस पक्ष आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्यातील मतदारसंघांचे वाटपही जाहीर करण्यात आलेले नाही.

गोव्यातील जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या मगोने आगामी निवडणुकीसाठी तृणमूल कॉँग्रेस पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले. त्यामुळे भाजपने मगो आणि तृणमूल कॉँग्रेस पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मगोने उमेदवारीसाठी निश्‍चित केलेल्या उमेदवारांना भाजपने आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मये मतदारसंघात मगोने निश्‍चित केलेले उमेदवार प्रेमेंद्र शेट यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. पेडणे मतदारसंघातील मगोने निश्‍चित केलेले अन्य एक उमेदवार प्रवीण आर्लेकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पेडण्याचे आमदार तथा उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी प्रवीण आर्लेकर यांच्या भाजपप्रवेशाला विरोध करून उमेदवारीवर दावा केला आहे. प्रवीण आर्लेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास उपमुख्यमंत्री आजगावकर यांना उमेदवारी मिळणे कठीण होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही राजकीय पक्षांनी व्हिटामीन-‘एम’चा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. पैशांच्या आमिषाने काही राजकीय नेते पक्षांतर करीत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पैशांच्या आमिषाने तृणमूलमध्ये प्रवेश केल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे.

भाजपमध्ये निष्ठावंतांना गृहित धरले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. भाजपच्या कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा आणि वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा या दोन आमदारांनी पक्षाकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने आमदारकीचा राजीनामा सादर करत असल्याचे म्हटले आहे. वास्को मतदारसंघात दाजी साळकर यांना भाजपमध्ये फेरप्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार नसल्याने आमदार आल्मेदा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मये मतदारसंघात प्रेमेंद्र शेट यांना प्रवेश देण्यात आल्याने भाजपचे आमदार प्रवीण झांट्ये यांचे महत्त्व कमी झाले आहे. सध्या आमदार झांट्ये यांनी मगोमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, अशी चर्चा आहे.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षाशी निवडणूक आघाडीची शक्यता फेटाळली आहे. आम आदमी पक्ष स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. ‘आप’च्या पणजी येथील महासभेला भरघोस प्रतिसादही लाभला. खाण व्यवसाय सुरू करणे आणि पारदर्शक प्रशासनाचे आश्‍वासन केजरीवाल यांनी यावेळी दिले.
आम आदमी पक्ष भंडारी समाजाचा मुख्यमंत्री देणार अशा घोषणेमुळे भाजपने भंडारी समाजातील नेत्यांना आपल्या बाजूने ओढण्यास सुरुवात केली आहे. साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर फोंड्याचे आमदार रवी नाईक यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारची महिलांसाठी ‘गृह आधार’ योजना सुरू आहे. भाजपच्या कार्यकाळात ही योजना सुरू करण्यात आली आहे. आम आदमी पक्षानेही महिलांसाठी योजनेची घोषणा केली आहे, तर तृणमूल कॉँग्रेस पक्षाने ‘गृहलक्ष्मी कार्ड योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे. या योजनेखाली महिलेला मासिक पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे, असे म्हटले आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १ लाख महिलांनी नोंदणी केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
आगामी निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे. केंद्र व राज्य या दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असल्याने कमीत कमी २२ उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. भाजपमधील काही नेत्यांनी आपल्या निकटवर्तीयांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या काही नेत्यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी न मिळाल्यास त्या नेत्याकडून पक्षविरोधी कारवाया केल्या जाण्याची शक्यता असल्याने भाजपने निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भाजपमधील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपमधील नाराज निष्ठावंतांकडून बंडखोरी केली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बार्देश तालुक्यातील मंत्री मायकल लोबो यांच्याकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. लोबो यांच्या पत्नीला उमेदवारी न दिल्यास ते दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मंत्री लोबो यांच्यावर दबाव आणण्यासाठी बार्देशमधील माजी आमदार जयेश साळगावकर, माजी आमदार रोहन खंवटे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

पर्वरीचे माजी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खंवटे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्‍चित केले होते. तथापि, कॉँग्रेसमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी योग्य वातावरण नसल्याचा दावा खंवटे यांनी केला आहे.

रिव्होल्युशनरी गोवन्स या संघटनेचे कार्यकर्ते गोवा सुराज पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या संघटनेच्या विविध मतदारसंघांत होणार्‍या जाहीर सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही संघटना काही ध्येय-धोरणे घेऊन निवडणूक लढविणार असून या संघटनेकडून सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे केले जाणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने कॉँग्रेस पक्षाशी निवडणूकपूर्व आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसने विधिमंडळ गटाच्या विलीनीकरणाच्या विरोधात सभापतींकडे तक्रार केली आहे. आमदार आलेमांव यांनी केलेले विधिमंडळ गटाचे विलीनीकरण बेकायदा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मगोमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले मंत्री दीपक पाऊसकर यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. माजी आमदार गणेश गावकर यांना भाजपची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मगोमधून बाहेर पडलेल्या दोघांच्या उमेदवारीबाबत अनिश्‍चितता व्यक्त केली जात आहे.

प्रियोळ मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. या मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी संदीप निगळ्ये यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, तर प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न चालविले आहेत. परंतु अजूनपर्यंत भाजपप्रवेशाला हिरवा कंदील मिळालेला नाही. मंत्री गावडे येत्या नवीन वर्षात कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपली राजकीय भूमिका निश्‍चित करणार आहेत.

पणजी मतदारसंघात भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. आमदार बाबूश मोन्सेरात आणि दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. तसेच, मुरगाव मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
आगामी निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षाने आतापर्यंत आठ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उमेदवारी जाहीर केलेल्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या नावांची घोषणा नवीन वर्षात होणार आहे. मगोच्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणासुद्धा नवीन वर्षात केली जाणार आहे. रिव्होल्युशनरी गोवनने विधानसभा निवडणुकीसाठी २६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

राज्यातील बेकारी, सरकारी नोकरभरती, वाढती महागाई यांसारखे अनेक प्रश्‍न घेऊन निवडणूक लढणार आहे. स्थानिक पातळीवर वीज, पाणी, रस्ते व इतर समस्या आहेत. राज्यातील घसरत चाललेल्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम आता मतदारांना करावे लागणार आहे. राजकीय नेत्यांच्या माकडउड्या बंद करण्याची गरज आहे. पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात असला तरी कायद्यातील पळवाटा शोधून पक्षांतरे केली जात आहेत. त्यासाठी हा कायदा आणखीन कडक करण्यासाठी दबाव अ
ाणण्याची गरज आहे.