- – डॉ. आरती दिनकर
ही बाई पंधरा दिवसांनी नवरा किती दारू पितोय? दारू प्यायल्यानंतरची लक्षणे कुठली? उलटी होते का? अर्थहीन बडबडतो का? व आता किती प्रमाणात दारू पितो?… वगैरे लक्षणे येऊन सांगत होती…
एक दिवस बाई दवाखान्यात आल्या व मला म्हणाल्या, ‘माझा नवरा मला रोज दारू पिऊन मारतो, मला जगण्याचा खूप कंटाळा आलाय. तुमच्याकडे होमिओपॅथीमध्ये दारूचे व्यसन सोडण्यासाठी औषधे आहेत असं कळल’ं. बाई तर बर्यापैकी सुशिक्षित वाटत होती पण परिस्थितीमुळे ती अगतिक वाटली. आणि ती धाय मोकलून रडू लागली. मीही तिला रडू दिले. तिचे रडून झाल्यावर मी म्हटलं सावकाश… मला काय झालं ते सांगा. तोपर्यंत मी बाकीचे रुग्ण तपासते.
जरा वेळाने शांत झाल्यावर परत ती माझ्या केबिनमध्ये आली आणि सांगू लागली, ‘मला आज नवर्याने दारू पिऊन खूप मारलं. का? तर त्याला दारू पिण्यासाठी मी पैसे दिले नाहीत म्हणून. तसा तो मला नेहमीच मारतो. आज मला असह्य झालं…’ असं म्हणून तिने मला पाठीवरचे जखमांचे व्रण दाखवले. घरात एक लोखंडाची सळई होती त्या सळईनेच तिच्या नवर्याने तिला मारले होते. शी! व्यसनं किती क्रूर कृत्य करायला लावतात! ती म्हणाली, ‘मी आज कामावरही गेले नाही. सरळ तुमच्याकडे आले डॉक्टर, तुम्ही कसेही करा पण तुमच्या होमिओपॅथीच्या औषधांनी माझ्या नवर्याचं दारूचं व्यसन घालवा. माझ्या मुलालाही तो मारतो. त्याला आता मी शेजार्यांकडे ठेवून आली आहे. तिनं मला परत तिची पाठ दाखवली, ‘हे घाव मी कितीतरी दिवसांपासून सोसत आहे पण आता सोसण्याची शक्तीच राहिली नाही. आज तो इतका प्याला की त्याने मला लोखंडाच्या सळईने मारले’. मग मी आधी तिच्या पाठीला औषध लावले व लवकर तिला बरे वाटावे म्हणून गोळ्याही दिल्या. मी तिच्या नवर्याचा स्वभाव, आवड-निवड, कुठे काम करतो… वगैरे मला औषध निवडण्यासाठी आवश्यक असलेले प्रश्न विचारले. नंतर ती म्हणाली, ‘ज्या दिवशी तो दारू पीत नाही त्या दिवशी माझ्याशी- मुलांशी चांगला वागतो, पण दारू प्यायल्यावर कुठला राक्षस त्याच्या शरीरात जातो कोणास ठाऊक? मग मला आणि मुलांना तो मारतो. पैसे बघतो. घराबाहेर काढतो.’
मी तिला विचारले, ‘त्याला काही मानसिक त्रास, चिंता, काळजी, मित्रांशी वाद, नातेवाइकांशी वाद असे काही आहे का?’ तर म्हणाली, ‘आमचा व्यवसाय होता त्यात त्यांना तोटा झाला, तेव्हापासून हे असे दारूच्या व्यसनात बुडाले.’
ह्या बाईच्या नवर्याला दारू सोडण्यासाठी होमिओपॅथीची औषधं दिली. पंधरा दिवसांनी ती माझ्याकडे आली, म्हणाली, ‘आता त्यांचं दारू घेणे जास्त वाढलं’. म्हटलं, ‘घाबरू नकोस, अगं तुझा नवरा सात-आठ वर्षे झाली दारू पितोय ती रक्तात किती भिनली आहे! ही बाई पंधरा दिवसांनी नवरा किती दारू पितोय? दारू प्यायल्यानंतरची लक्षणे कुठली? उलटी होते का? अर्थहीन बडबडतो का? व आता किती प्रमाणात दारू पितो?… वगैरे लक्षणे येऊन सांगत होती व त्या-त्या लक्षणांनुसार मी तिला तिच्या नवर्यासाठी होमिओपॅथिक औषधांची उपाययोजना करीत होते. सहा-साडे सहा महिन्यांनी आली ती नवर्याला बरोबर घेऊनच आली. तो म्हणाला, ‘डॉक्टर मला आता फारशी दारू पिण्याची इच्छा होत नाही. पण पिणं एकदम बंद झालं नाही. फरक एवढाच की, प्रमाण कमी झालं.’ असं करत करत हळूहळू जवळपास बारा ते तेरा महिन्यांमध्ये या माणसाचं दारूचं व्यसन पूर्णपणे सुटलं.
तो म्हणाला, ‘डॉक्टर तुमच्या औषधांमुळे आता दारू सुटली. नाहीतर मी माझ्या संसाराला, जीवनाला मुकलो असतो.’ यावर ती बाई डोळ्यात आसवांचे कड आणून म्हणाली, ‘खरंच डॉक्टर, जादूची कांडी फिरवल्यागत झालं बघा. नाहीतर मलाही असंच वाटत होतं माझं आयुष्य असंच मला घालवावं लागणार…, दारू पिलेल्या माणसाचा मार खावा लागणार. पण तुम्ही भेटलात. उपाय केलात. त्यांना आता दारूचा वासही सहन होत नाही, मग दारू पिणे तर सोडाच! डॉक्टर तुमचे उपकार मी कसे फेडू? म्हटलं, ‘अगं त्यात उपकार कसले? आणि तुला जर उपकारच वाटत असतील तर त्या उपकाराचे ओझे घेऊन अशाच तुझ्यासारख्या नडलेल्या लोकांना मदत कर’.
अशीच माझ्या पस्तीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये गांजा, कोकेन, तंबाखू ही व इतर व्यसनं यशस्वीपणे होमिओपॅथीच्या औषधांनी सोडलेल्यांची ही उदाहरणे आहेत.