वेळापत्रक पूर्वीच ठरल्याने अधिवेशन कालावधी वाढविणे अशक्य : सभापती

0
156

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे वेळापत्रक तयार झालेले असल्याने अधिवेशनाचा कालावधी आणखीन वाढविणे शक्य नाही, अशी माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाचा १२ दिवसांचा कालावधी वाढवून १८ दिवस करण्याची मागणी करण्यात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा २२ दिवसांचा कालावधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे केवळ ४ दिवसांवर आणण्यात आला होता. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांना मतदारसंघांतील प्रश्‍न मांडण्याची संधी मिळाली नव्हती. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवून प्रश्‍न, समस्या मांडण्याची संधी देण्याची मागणी कॉंग्रेस आमदारांनी केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना सभापती डॉ. सावंत म्हणाले की, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यासाठी एक निवेदन सादर केले आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते कवळेकर यांना याबाबत स्पष्टीकरण दिले जाणार आहे. यापूर्वी १० दिवसांचे अधिवेशन झालेले आहे. आता १२ दिवसांचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प, अनुदानित पुरवणी मागण्या व इतर कामकाज होणार आहे. सर्व आमदारांना प्रश्‍न मांडण्यासाठी योग्य संधी दिली जाणार आहे. पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आल्याने त्यात बदल करणे शक्य होणार नाही, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.