- प्रतिभा कारंजकर
तोच सूर्य, तोच चंद्र, तीच धरा आणि तेच गगन. पण प्रत्येक ठिकाणची त्याची सौंदर्याची अनुभूती निराळी असते. विविध माणसांचे विविध अनुभव आपल्याला घडवत जातात त्यातून अनुभवपूर्ण असा निखळ आनंद मिळतो. आपल्या आयुष्याच्या डायरीत एका नव्या पानाची भर पडत असते.
कोरोनाने आपले पसरलेले पाय जरा आकसत घ्यायला सुरुवात केल्याने लगेचच टूर कंपनीच्या जाहिराती सुरू झाल्या, म्हटलं चला, बरं झालं! एकदाची कालचक्राला गती मिळू लागली, हळूहळू का होईना जग पूर्वपदावर येऊ घातलंय. आता माझ्यासारख्या, भटकंतीत मन रमवणार्या पक्ष्यांच्या पंखांना भरारी घ्यायला मिळेल ही आशा मनाला उभारी देऊन गेली.
प्रवास… मग तो सातासमुद्रापार असो की देशांतर्गत किंवा अगदी जवळच्या गावचा, पूर्वतयारी करणं गरजेचं ठरतं. ती मानसिक, आर्थिक, शारीरिक आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन करावी लागते. पूर्वीच्या काळी कुणी प्रवासाला निघाला की ‘प्रवास सुखकर होवो’ या आशीर्वादासह त्याच्या हातावर दहीसाखर ठेवत. म्हणजे प्रवास कुठलाही त्रास न होता, काहीही अडचण न येता सुखद व्हावा असं त्याचं आनंदी स्वरूप असावं. अगदी अलीकडेपर्यन्त प्रवास हा कामासाठी, कामापुरता किंवा काही वेळा प्रसंगावशात नातेवाइकांना भेटण्यास केला जायचा. बारा महिने राबराब राबणारे हात, त्यांना विश्रांती मिळावी म्हणून वारीला पंढरपूर किंवा कुलस्वामिनी, कुलदैवत अशा ठिकाणी देवदेव करण्यासाठी बाहेर पडत. काशीला जाणारा माणूस सदेह सुखरूप परतला म्हणजे त्याकाळी मोठ्ठं आश्चर्य मानलं जायचं. कारण तशा प्रवासाच्या सोयी नव्हत्या, खूप परिश्रम घेऊन ते घडायचं. परदेशी म्हणाल तर समुद्र ओलांडायला आपल्या धर्माने त्यावर बंदी घातली होती. त्यामुळे आपल्याकडे परदेशात जसे साहसी दर्यावर्दी होते तसे होऊ शकले नाहीत पण माणसाच्या मनात आत खोलवर एक जिप्सी दडलेला असतो. त्याला सतत नावीन्य हवे असते. नवीन जागा, नवीन माणसे, नवी संस्कृती यांच्या शोधात तो असतो. त्यामुळे त्याला भटकंती करावीशी वाटते.
आताशा लोकांकडे तसा पुरेसा पैसा हाताशी आला की मनात फिरण्याचा विचार डोकावू लागतो. पूर्वी आपली अंथरुणाची वळकटी, फिरकीचा तांब्या, एक कपड्यांचे होल्डऑल आणि चार घरी केलेले सुके, टिकणारे पदार्थ घेऊन प्रवास केला जायचा. आत्ताच्या तंत्र आणि यंत्र यांच्या युगात सर्वच समीकरणे बदलली आहेत.
सध्या सण-वार संपत आलेले असल्याने आणि बरेच दिवस कुठेही बाहेर पडता आलं नसल्याने बरेच लोकांचा कुठेतरी दूरवर फिरायला जाण्याचा मूड बनत आहे. पावसाळा ओसरत आला की वेध लागतात गुलाबी थंडीचे. त्या दृष्टीने हिवाळी पर्यटनाच्या जाहिराती आणि त्याची माहिती मोबाईलवर यायला सुरुवात झाली आहे. हिवाळा हा ऋतू फिरण्यासाठी अगदी योग्य म्हटला पाहिजे. हवेत गारवा असतो त्यामुळे मन उत्साहित असतं. ताजंतवानं वाटत असतं. थोडे गरम कपडे बरोबर घेतले की बस. सध्या सरकारनेही भरपूर सवलती देऊन पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचा मनसुबा रचला आहे. वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या सुविधांमुळे कामावर जाणार्यांसाठीही ती एक सुवर्णसंधी प्राप्त करून दिली आहे. कुटुंबासहित फिरायला जाण्यासाठी व कामात खोळंबाही होत नाही.
कुठे फिरायला जायचं हा सर्वस्वी आपापला निर्णय असतो. आपली आवड-निवड, पैशाची सोय, हवामानाचा प्रभाव, प्रवास कसा करणार याबाबतची आवड यावरून ते ठरवत असतात. जवळची ठिकाणे म्हटली तर गुलाबी थंडीचा मस्त गारवा अनुभवण्यासाठी महाबळेश्वर, पांचगणी, माथेरान अशी थंड हवेची ठिकाणे आहेतच आणि बजेटमध्ये बसणारी आहेत. ज्यांना देवदेव करायची आवड असते त्यांच्यासाठी बरीच ठिकाणे आहेत- अष्टविनायक यात्रा, ज्योतिर्लिंग यात्रा, नर्मदा परिक्रमा, दत्ताची तीर्थक्षेत्रे, इतिहासाची माहिती आणि आवड असेल तर विजय नगरचे साम्राज्य असलेले हम्पी होसपेट, बदामी, औरंगाबाद येथील अजंठा, वेरूळची कोरीव लेणी, थोडा दूरवरचा टप्पा गाठायचा असेल तर काश्मीरसारखा पर्याय आता सुरक्षित आहे. हिमाचल येथील ठिकाणे, दिल्ली- आग्रा- मथुरा- काशी हेही पर्याय विचारात घेता येतात. अजून विशेष गर्दी नसल्याने रेल्वेची तिकिटे किंवा विमानाची तिकिटे उपलब्ध होत असतील. ज्यांच्या बजेटचा आवाका मोठा असेल त्यांनी परदेश टूरबद्दल विचार करायला हरकत नाही. विमानाची उड्डाणे आता पूर्ववत सुरू होतीलच लवकर आणि टूरकंपनीसुद्धा पर्यटक येण्याची वाटच पाहत आहेत. या दोन वर्षात त्या व्यवसायाला पूर्णपणे टाळा लागलेला होता. आता त्यांनीही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजना आखायला सुरुवात केली आहे. पूर्णपणे सुरक्षिततेची हमी घेत केलेले पर्यटन ही सध्या काळाची गरज बनली आहे. समृद्ध इतिहास, भाषा, संस्कृती यांची विविधता, अनुपम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या युरोपची नितांत सुंदर अशी ही भूमी जगभरातल्या पर्यटकांना खुणावत असते. तिथल्या थंडीचा कडाका सोसवणार असेल तर बर्फाळ युरोपचे दर्शन खरेच खूप मोहक असते. स्विझर्लंड, स्कॉटलँड अशा ठिकाणी खासकरून बर्फावरचे स्कीईंग, स्केटिंग या खेळांसाठी मुद्दाम लोक जात असतात, तो अनुभव काही वेगळाच असतो. पण ते धाडस करणारे तरुणाईतले जवानच हवेत. तिथे वयस्क माणसांना त्रास होऊ शकतो. आपल्याकडे दर सुट्टीला मामाच्या गावी जायचा पर्याय असायचा पण आता कुणी कुणाकडे फारसं जायला मागत नाहीत त्यामुळे मुलांच्या दिवाळीच्या किंवा ख्रिसमस सुट्टीत फिरायला जाण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडले जातात. त्यामुळे मुलांना आपला देश, आपली संस्कृती, माणसे यांची माहिती होत जाते. गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक इथेही आपल्याला आठ- दहा दिवसात पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. आणि बरेच ठिकाणचे बुकिंग आता घरबसल्या ऑनलाइन करता येत असल्याने सोप्पे पडते.
गुजरातमध्ये गिर अभयारण्य सिंहासाठी प्रसिद्ध आहे. सोमनाथ मंदिर जे ऐतिहासिक काळात बरेचदा लुटले गेले, ते पाहायला मिळते. श्रीकृष्णाची द्वारका नगरी जिथे बोटीतून जावे लागते, गांधीजींचा साबरमती आश्रम, गांधींचे जन्मस्थान, राणी की वाव आणि हल्लीच नव्याने उभारलेला वल्लभ भाई पटेलांचा भव्य पुतळा- ‘स्टँचू ऑफ युनिटी’ बघण्यासारखा आहे. जुनागड येथील प्राचीन मंदिरे, गांधीनगर येथील अक्षर धाम, गिर पर्वतावर जाण्यासाठी गंडोलाची सोय आहे.
राजस्थान ह्या पवित्र भूमीवरही अंबर पॅलेस, हवामहलची प्रसिद्ध वास्तू, जंतर-मंतर, जयपूर पॅलेस, मेहरगड म्युझियम, जलमहल, जयगड किल्ला, जैसलमेर किल्ला चितोड गड, जुनागड, दिलवार टेंपल, पुष्कर तीर्थ, हजरत मसजीद, उंट पालन केंद्र. अशा ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत.
भटकंती हा तणाव दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. प्रवास मग तो एकट्याने केलेला असो की ग्रुप बरोबर त्या प्रत्येकाची खास अशी खासियत असते. प्रवास केला जातो तो स्वत:च्या आनंदासाठी. मग कुणाला आपल्या सोबत्यांसोबत राहण्याने मिळत असतो तर कुणाला एकटेपणा प्रिय असतो. त्यात स्वातंत्र्य असते. एकट्याने प्रवास करणं जरा साहसी ठरतं तर दोन-चार जणं बरोबर असतील तर सोबत होते, वेळप्रसंगी उपयोग होतो. आनंद द्विगुणित होतो. पण बाकीच्या मेंबर्सना तयार करावे लागते. त्यांच्या सवडी निवडी आवडी लक्षात घ्याव्या लागतात. अशा वेळी सगळ्यांची ऍडजस्ट करायची तयारी हवी. जबाबदारी वाटून घेतली जाते. एकत्र काळ व्यतीत केल्याने मैत्री- स्नेह वृद्धिंगत होतो. कुणाला ग्रुपमध्ये आवडतं तर कुणाचं ग्रुपशी फारसं सख्य जुळत नाही. आता अनेक ट्रॅव्हल कंपन्या आपल्या आजूबाजूला दिसतात- त्यात पैसे भरले की झालं, मग तुमच्यावर कसलीच जबाबदारी राहात नाही. सगळ्या सोई ते बघतात. टेंशन विरहित प्रवास, व्हिसा, हॉटेल, बुकिंग, विमान बसेस ट्रेन, खाणेपिणे, मेडिकल इन्शुरन्स सार्या जबाबदार्या त्यांच्या असतात. पण तिथे सर्वच नियोजन त्यांचे असते त्यामुळे सर्व तुमच्या मनासारखे असेलच असे नाही. पण तिथे नवीन ओळखी होतात. गप्पा-टप्पा यात वेळ निघून जातो. एकत्र राहिल्याने सामाजिक जाणिवा प्रगल्भ होतात. प्रवास हा संस्मरणीय, आनंदी, मनोरंजक होतो. पण विचारांचा विरोधाभास असेल तर भांडाभांड होऊ शकते. एकट्याने प्रवास करायचा असेल तरी हल्ली घरबसल्या सगळे ऑनलाइन बुकिंग करून सोई मिळवता येतात. ट्रीप ऍडव्हायजरची मदत घेता येते. शिवाय गुगलमॅपसारखे गाइड मार्गदर्शक असतात. इंटरनेट, वाय फाय यांच्याद्वारे कुठे जायचं, काय बघायचं, कुठे राहायचं या सर्वांची आधीच कल्पना मिळते त्यामुळे आधीच तयारी करून निघता येते.
प्रवासाने माणूस बहुश्रुत होतो. अनुभवसंपन्न बनतो. त्याची सृजनशीलता वाढते. दृष्टीची क्षितिजे विस्तारतात. मनाचं कोतेपण नाहीसं होतं. ‘अवघे विश्वची माझे घर’ ही वैश्विक भावना वाढीस लागते. बाहेरच्या जगातली वैविध्यता, वैचित्रता, तिथल्या संस्कृतीत असलेली भिन्नता पाहायला- अनुभवायला मिळते. अशा वेळी आपण पैसे देऊन अनुभव विकत घेत असतो.
सर्व दृष्टींनी निसर्गसंपन्न अशा आपल्या भारतात काय नाही? उंच शिखरमाथ्यांचे पर्वत, मैलोन्मैल पसरलेली विस्तीर्ण वाळवंटे, समृद्ध सागरकिनारे, अभयारण्ये, विविधतेने नटलेली हिरवीगार जंगल संपदा, वनराई, प्राचीनतेची साक्ष पटवणारी मंदिरे, कोरीव लेणी, नैसर्गिक आश्चर्ये यांनी समृद्ध असा आपला देश पाहायला देशीच नव्हे तर परदेशी पर्यटकही गर्दी करतात. निसर्गाच्या अनेकविध रंगांचे डोळे भरून दर्शन घेताना तृप्त वाटतं. तोच सूर्य, तोच चंद्र, तीच धरा आणि तेच गगन. पण प्रत्येक ठिकाणची त्याची सौंदर्याची अनुभूती निराळी असते. विविध माणसांचे विविध अनुभव आपल्याला घडवत जातात त्यातून अनुभवपूर्ण असा निखळ आनंद मिळतो. दरवेळी तो चांगलाच असेल असंही नाही. क्वचित प्रसंगी कायमचा लक्षात राहील इतका वाईटही असू शकतो पण तरीही आपल्या आयुष्याच्या डायरीत एका नव्या पानाची भर पडत असते. अक्कलखाती एक नवा अनुभव जमा होतो. म्हणूनच प्रत्येकाने जमेल तसा जमेल तेव्हा प्रवास केला पाहिजे.