वेदांताची खनिज वाहतूक दुसर्‍या दिवशीही रोखली

0
132

कोडली येथील वेदांता कंपनीच्या गेटसमोर हजारो ट्रकमालक दुसर्‍या दिवशी एकत्रित झाल्याने पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतूक करण्याचा कंपनीचा बेत पुन्हा फसला. गोवा स्पॉईंज कंपनीचा एक ट्रक ट्रक मालकांनी रस्त्यावर रोखून धरल्याने परिसरात वातावरण तंग झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून स्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ट्रक मालकांनी दिला आहे.

सोमवारी पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतुकीचा प्रयत्न फसल्याने कंपनीने काल आणखी पोलिसांना पाचारण केले होते. त्यामुळे कंपनीच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परिसरात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून उपजिल्हाधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी ट्रकमालक, कंपनीचे अधिकारी, उपअधिक्षक व निरीक्षकांची बैठक घेतली. मात्र, बैठकीत काहीच तोडगा निघू शकला नाही. गोवा स्पॉईंजचा एक ट्रक कोडलीहून जात असताना संतप्त जमावाने रोखून धरला. त्यामुळे वातावरण तंग बनले. उपस्थित पोलिसांनी धाव घेऊन ट्रक माघारी पाठविला. यावेळी संतप्त जमाव व पोलीसांमध्ये बाचाबाची झाली.वेदांता कंपनीच्या कामगारांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन ट्रक मालकांनी खनिज वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. खनिज वाहतूक सुरू होत नसल्याने कामगारांना घरी पाठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केलेला दर मान्य करण्याची मागणी कामगारांतर्फे बोलताना अपर्णा गोवेकर यांनी केली. ट्रक मालकांनी ही मागणी धुडकावली.

बालाजी गावस यांनी ट्रकमालक गेले दोन दिवस मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, राज्यातील सरकारला ट्रकमालकांचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला. वेदांता कंपनीचे अधिकारी हुकुमशाही चालवित आहेत. मात्र, मागणी पूर्ण होईपर्यंत खनिज वाहतूक सुरू करू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.