वी आर टूगेदर

0
188
  • अंजली विवेक मुतालिक
    (कुडाळ)

ही दुनिया फक्त फिगर ओरिएंटेड झाली आहे. महिला शारीरिक फिगर मेंटेन करतात नि पुरुष इनकम फिगर वाढवत बसतो. दोघेही एकमेकांच्या फिगरवर लक्ष ठेवून असतात.

महिला आरक्षण नि महिला स्वातंत्र्य यावर खूप बोललं जातं. आज कितीतरी महिला मोकळा श्वास घेत आहेत असं आपण म्हणत असलो तरी ते कितपत सत्य असतं ते प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे.
खूप तात्विक किंवा किचकट उदाहरण न देता सहज जाता जाता समोर आलेली उदाहरणे सांगते म्हणजे डोक्याला टेन्शन नको.

परवाच नवर्‍याच्या बरोबरीने लाखभर रुपये पगार मिळवत असलेली एक बाई मला म्हणाली, ‘अग मला गेट टूगेदर ट्रीपसाठी नवर्‍याची फुल्ल परवानगी मिळाली आहे’. मला कसंतरी वाटलं. तू ट्रीपला जाणार तर त्याला परवानगी मागायला लागते? विचारणं.. सांगणं ठीक आहे. पण हे का आपलं स्वातंत्र्य?
अर्थाजन नि पाककला सर्व मानवप्राण्यांना जमली पाहिजे. म्हणजे ज्याला ज्याला भूक लागते त्याने स्वतः कुक झाले पाहिजे. तिथेही कित्तीतरी घरात समानता दिसत नाही.
‘तो मिळवून आणतो ना तर त्याला काय सांगतेस मटार सोलायला?’… असली वाक्य आपल्या समाजातून आऊट डेटेड झाली पाहिजेत.

घर दोघांचं तर दोघांनीही ते आवरलं सावरलं पाहिजे. कोणाची मिळकत किती यावर एखाद्या व्यक्तीचं त्या घरातील स्थान ठरू नये.
ओव्हरऑल ही दुनिया फक्त फिगर ओरिएंटेड झाली आहे. महिला शारीरिक फिगर मेंटेन करतात नि पुरुष इनकम फिगर वाढवत बसतो. दोघेही एकमेकांच्या फिगरवर लक्ष ठेवून असतात. अर्थात आरोग्य ही गोष्ट पुरुष वर्गातही आवश्यक आहेच. व्हाईस व्हर्सा काहीतरी इनकम असणं ही आजच्या स्त्री वर्गासाठी आवश्यक आहेच.
‘तुला काय कमी आहे का? तू नोकरी करून पैसा मिळवू नकोस. फक्त कुटुंब आणि मुलं यांकडे लक्ष दे’ … असा पुरुषी स्वर बर्‍याच ठिकाणी आढळून येतो. केवळ नोकरी पैसे मिळवणं ही तिची गरज नसते तर स्वतःला आवडत्या कामात गुंतवून ठेवणे आणि आपल्या छंदाचे रूपांतर पैशात झाले तर कोणालाही आनंद नि समाधान मिळतेच.
मूल ५ वर्षाचे होईपर्यंत त्याला आई ही अत्यावश्यक असते. त्यावेळी आई स्वतःचा वेळ पिलांसाठी आवडीने देत असते. बर्‍याचदा मुली करिअर करिअर म्हणत बसतात. त्याचा अर्थ नीट समजून न घेता- मला मुल नको… फिगर खराब होते…. मला जबाबदारी नको….
वरील बावळट विचारांनी आई न होता एका सुंदर सृजन सोहळ्याला मुकतात.
काही ठराविक कालानंतर मग आता डोळे उघडून दत्तक वगैरे घेऊ, असा विचार करतात. अर्थात हा विचार उत्तमच आहे पण दात असताना चणे खाल्ले असते तर?
ओव्हरऑल दत्तक हा विषय उत्तम आहेच. निराधार बाळाला लळा लावून त्याला हक्काचे आई-बाबा मिळणे यातही सामाजिक भान जपत आनंद आहेच.

कर्तृत्व जपत असताना मातृत्वसुदधा तितकेच गरजेचे आहे. स्त्री म्हणून मिळालेल्या देवदत्त देणगीचा सोहळा अनुभवता आला पाहिजे. खरंतर खूप छोट्या छोट्या गोष्टींत लपलेला हा असा आनंद शोधून त्याचा सोहळा करायला शिकलं तर जगणं अधिक सुंदर होतं.
शिक्षण- करिअर- लग्न- मुलं- मग आराम आणि शेवटी ‘हे राम’ म्हणत जीवन संपवावे अशी कुठे नियमावली नाही.

प्रत्येकाने मनमानी करत हवं तसं जगत राहावं असंही नाही. चांगलं काय नि वाईट काय याचा सारासार विचार डोकं असलेला हर एक जीव करत असतोच. त्यामुळे मी कुणाला काही अक्कल वगैरे शिकवायला हे लिहीत नाही.
माणूस म्हणून मी प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळवून देईन नि तिच्याशी आणि समाजातील पुरुष, महिला आणि हिजडा या सर्व माणसांना माणूस म्हणून समान वागणूक देईन… असे सुज्ञ आचरण करेन इतकंच!