वीज सुधारणांसाठी गोव्याला नाईकांच्या मंत्रालयाचा फायदा

0
10

>> मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त; सर्वांचे सहकार्य घेणार

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या ऊर्जा मंत्रालयाचा वीज क्षेत्रातील सुधारणांसाठी गोव्याला निश्चित लाभ होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला.

केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर आणि राज्यमंत्री श्रीपाद नाईक या दोघांचे वीज क्षेत्रातील सुधारणांसाठी सहकार्य घेतले जाणार आहे. गोवा राज्यात विजेची निर्मिती होत नाही. गोवा परराज्यातून मिळणाऱ्या विजेवर अवलंबून आहे. गोवा सरकारने सौरऊर्जा आणि इतर अपारंपरिक ऊर्जेला चालना देण्यास सुरुवात केली आहे. श्रीपाद नाईक यांच्या माध्यमातून या कामाला आणखी गती मिळण्यास मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व इतर सर्व कंबिनेट मंत्र्याचे गोव्याच्या विकासासाठी सहकार्य घेतले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
श्रीपाद नाईक यांच्या ऊर्जा मंत्रालयाचा गोव्यातील वीज क्षेत्रातील सुधारणांसाठी चांगला वापर करून घेतला जाणार आहे, असे राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.

श्रीपाद नाईकांनी पदभार स्वीकारला
खातेवाटप झाल्यानंतर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी नवी दिल्ली येथे आपल्या कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील अधिकिरी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर श्रीपाद नाईक यांनी मंत्रालयाच्या कामकाजाशी संबंधित काही फाईल्सही हाताळल्या.