>> ऑक्टोबर-डिसेंबरसाठी ५०% दरवाढ होणार
राज्यातील वीज ग्राहकांना ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तीन महिन्यांसाठी वीज दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत वीज दरात साधारण ५० टक्के वाढ होणार आहे.
वीज खात्याच्या मुख्य वीज अभियंता रेश्मा मॅथ्यू यांनी वीज दरवाढीसंबंधीची सूचना जारी केली आहे. गोवा राज्यात विजेची निर्मिती होत नसल्याने परराज्यातून वीज खरेदी करावी लागत आहे. संयुक्त वीज नियमन आयोगाकडून इंधन व वीज खरेदी खर्चानुसार वीज बिलासाठी प्रति युनिट रक्कम निश्चित केली जाते. त्यामुळे दर तीन महिन्यांनी राज्यातील वीज दरात नेहमी चढ उतार होत असतो.
नवीन फॉर्म्युल्यानुसार घरगुती विजेसाठी पहिल्या १०० युनिटला १८.३० पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. मागील तीन महिन्यांसाठी हा दर ९.३४ पैसे प्रति युनिट असा होता. १०१ ते २०० युनिटसाठी १८.७९ पैसे प्रति युनिट, २०१ ते ३०० युनिटसाठी २३.९६ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ४०० युनिटसाठी २९.८६ पैसे प्रति युनिट आणि ४०० युनिटवरील विजेसाठी ३३.१५ पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे.
व्यावसायिक विजेसाठी पहिल्या १०० युनिटसाठी ३६.१० पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. मागील तीन महिन्यासाठी हा दर १८.४२ पैसे प्रति युनिट असा होता. १०१ ते २०० युनिटसाठी ३६.७० पैसे प्रति युनिट, २०१ ते ४०० युनिटसाठी ४३.४८ पैसे प्रति युनिट आणि ४०० युनिटपेक्षा जास्त विजेसाठी ४३.३२ पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. उद्योग कंपन्यांसाठी पहिला ५०० युनिटसाठी ३८.२३ पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. मागील तीन महिन्यासाठी १९.५१ पैसे प्रति युनिट असा दर होता. ५०० पेक्षा जास्त वीज वापरासाठी ३४.४६ पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. हॉटेल उद्योगासाठी ४०.९२ रुपये प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. मागील तीन महिन्यासाठी हा दर २०.८८ पैसे प्रति युनिट असा होता. तात्पुरत्या एलटी घरगुती कनेक्शनसाठी पहिल्या १०० युनिटसाठी २७.४४ पैसे प्रति युनिट दर आकारला जाणार आहे. तात्पुरत्या एलटी व्यावसायिक कनेक्शनसाठी पहिल्या १०० युनिटसाठी ४७.३० पैसे असा दर आकारला जाणार आहे. उद्योगासाठीच्या उच्च दाबाच्या एचटीआय कनेक्शनसाठी ४४.७१ पैसे प्रति युनिट आणि ११० केव्हीसाठी ४०.०४ पैसे प्रति युनिट असा दर आकारला जाणार आहे. विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी ३८.८१ पैसे प्रति युनिट दर आकारला जाणार आहे.